सातारा जिल्ह्यातील कारखाने ऊसाच्या गाळपात पुढे; दर देण्यात मागे!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 07:12 PM2021-05-29T19:12:44+5:302021-05-29T19:20:06+5:30
साखर उताराही चांगला; जिल्ह्यातील तीन कारखाने टॉप टेनमध्ये
सातारा : ऊस गाळपामध्ये राज्यातील कारखान्यांच्या यादीत दहावा क्रमांक पटकावलेल्या सातारा जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना दर देण्यात मात्र मागच्या पायावर आहेत. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी १४४ दिवस गाळप हंगाम करून ९९ लाख ८ हजार २१ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले, त्यातून १ कोटी ११ लाख ६३ हजार ४२० क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली. जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ११.२७ टक्के इतका राहिला आहे.
जरंडेश्वर कारखान्याने जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त १४ लाख ३८ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले त्यातून १६ लाख ५६ हजार १५० क्विंटल साखर निर्मिती केली. कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने साखर उताऱ्यामध्ये पहिल्या दहा कारखान्यांच्या यादीत सहावा क्रमांक मिळवला असून तब्बल १२.६७ टक्के साखर उतारा मिळवला आहे.
शेतकऱ्यांना दर देण्याच्या बाबतीत कारखान्यांनी आखडता हात घेतल्याचे पाहायला मिळते. साखर निर्मिती आणि उताऱ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कारखाने सर्वात पुढे असले तरी शेतकऱ्यांना ऊसाचा दर देण्यामध्ये मागे पडले. राज्यातील ज्या दहा कारखान्यांनी शेतकऱ्यांना चांगला दर दिला त्या १० कारखान्यांच्या यादीत सातारा जिल्ह्यातील पंधरा कारखान्यांपैकी एकाही कारखान्याचे नाव नाही. कोरोनाचे संकट असतानादेखील साताऱ्यातील बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत.
जिल्ह्यातील सह्याद्री, कृष्णा, जरंडेश्वर हे कारखाने गाळपमध्ये पुढे असले तरी कुठल्याही कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. किसनवीर कारखान्याने तर अनेक वर्षांपासून एफ आर पी थकवलेली आहे. तीन वर्षे सतत या कारखान्याला साखर आयुक्तांमार्फत नोटीस बजावली जाते; परंतु कुठल्याही प्रकारची वसुली होत नाही.
राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना