आमदारांना कारखाना वारसाने मिळाला
By Admin | Published: February 19, 2017 12:08 AM2017-02-19T00:08:02+5:302017-02-19T00:08:02+5:30
दमयंतीराजे : शिवेंद्रसिंहराजेंचे नाव न घेता टीका; शेंद्रे गटात प्रचारसभा
सातारा : ‘खासदार उदयनराजे भोसले यांनी वडिलांचे छत्र हरपल्यावर केलेला कडवा संघर्ष आणि कष्टातून काढलेला मार्ग तसेच आमदारांना त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वडिलोपार्जित वारसा या बाबी नकीच मतदारांनी आणि जनतेने तपासल्या पाहिजेत. आमदारांना कारखाना, बँक, बझार, गिरणी वडिलांपासून वारसाने मिळाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. जनतेच्या हिताकरिता संघर्ष करणाऱ्या उदयनराजेंनी कोणाचेही पाठबळ नसताना समाजकारण करताना जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे,’ असे प्रतिपादन ‘नक्षत्र’च्या संस्थापिका दमयंतीराजे भोसले यांनी केले.
सातारा विकास आघाडीच्या शेंद्रे गट, गण आणि दरे खुर्द गणातील उमेदवारांच्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. जकातवाडी, वेचले, भरतगाववाडी, बोरगाव येथे सभा झाली. यावेळी शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ योगेश शिंदे, शेंद्रे गणाच्या उमेदवार मनीषा क्षीरसागर आणि दरे खुर्द गणाचे उमेदवार हणमंत गुरव, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, अॅड. अंकुशराव जाधव, नगरसेविका स्मिता घोडके, स्रेहा नलवडे, सरपंच सीताबाई पवार, उपसरपंच दीपक देशमुख, बाजीराव बाबर, रवी पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील काटकर म्हणाले,‘सर्वांनी ठरविले होते की उदयनराजे देतील त्या उमेदवाराचे आपण काम करायचे. अधिकृतपणे मला उमेदवारी मिळाली; परंतु दुसऱ्याचे चांगले झालेले न पाहावणारी मंडळींपैकी एकाने अर्ज माघारी न घेता बंडखोरी केली. तथापि, सातारा विकास आघाडीला धोका होऊ नये म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांच्या सांगण्यावरून उमेदवारी मागे घेतली आहे. लोकांनी राजकारणामधील काही संकेत समजून घेऊन आपल्या इच्छा व्यक्त करायच्या असतात. दुसऱ्याला मागे खेचण्याची वृत्ती शेंद्रे गटातील जनता कधीही स्वीकारणार नाही.’
यावेळी सर्जेराव मोहिते, दगडू सुतार, विजय पडवळ, उत्तम भोसले, धनराज दौंडे, संजय सणस, संतोष लोंढे, सागर शिंदे, दीपक देवकर, धनंजय सणस, वैभव शिंदे, अमोल कांबळे, प्रसाद शेळके, महेश भोसले, गोविंद देशमुख, सतीश पवार, रवींद्र चव्हाण, भानुदास गोळे, विकास माने, धनाजी शेडगे, हिम्मतराव जाधव, नंदू पोतेकर, बजरंग कदम, संजय पोतेकर,राजेंद्र गोडसे आदी उपस्थित होते.
सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच दीपक देशमुख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उदयनराजेंचे यश विरोधकांना सहन होत नाही
दमयंतीराजे म्हणाल्या, ‘खासदार उदयनराजेंना कोणाचेही विशेष पाठबळ नाही. त्यांनी पदाची अपेक्षा ठेवून कधी राजकारण केले नाही. नाही तर आजपर्यंत त्यांना अनेकवेळा मंत्रिपदे मिळाली असती. तथापि त्यांनी कोणत्याही पदापेक्षा जनतेच्या मनामध्ये असलेले स्थान याला जास्त महत्त्व दिले आहे. सर्वसामान्य जनतेचा असलेले प्रचंड विश्वास हीच त्यांची खरी संपत्ती आहे. जनेतच्या प्रेमाच्या ताकदीवरच उच्चांकी मताधिक्य मिळाले आहे. आणि हेच विरोधकांना सहन होत नाही.’