फडणवीसांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:41 AM2021-01-13T05:41:36+5:302021-01-13T05:41:36+5:30
सातारा : ‘सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो ...
सातारा : ‘सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला किंवा त्यांची पकड आहे हे मला मान्य नाही. आम्हीही ग्रामपंचायत निवडणुकीत ताकदीने उतरलो आहे,’ असा दावाच खा. गिरीश बापट यांनी केला. त्याचबरोबर ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे,’ असेही ठामपणे त्यांनी सांगितले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर खा. गिरीश बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने ते दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खा. बापट म्हणाले, ‘महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा विचार केंद्र शासनाने अमलात आणला आहे. खेडोपाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेड्यातील स्वयंरोजगाराला चालना देण्यात येत आहे. ‘मनरेगा’सारख्या योजना सुरू आहेत. हे सर्व कोणामुळे होत आहे हे लोकांनाही माहीत आहे. याचा बेस आमच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत याचा फायदा भाजपला नक्कीच होईल. तसेच भाजपचे संघटन वाढून पक्षाला बळही मिळेल.’
सातारा जिल्ह्याचे प्रश्न माहीत आहेत. राजकारण कसे चालते याचीही माहिती आहे. भाजपच्या संघटनासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून खा. बापट पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यातील ५५५ ग्रामपंचायतींच्या ठिकाणी भाजपने कमी-अधिक फरकाने पॅनल उभे केले आहे. तीन हजार कार्यकर्ते निवडणूक रिंगणात आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भाजपचे अडीच हजार कार्यकर्ते निवडून येतील.’
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व इतर काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली असल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर खा. गिरीश बापट म्हणाले, ‘अभ्यास करून एखाद्या नेत्याच्या बंदोबस्तात फरक होतो. याचा अर्थ दुर्लक्ष होत आहे, असा होत नाही. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबाबतही असे झाले. यामध्ये राजकीय आकस आहे, असे मला वाटत नाही. तरीही भाजपचे व विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांची फौज संरक्षणासाठी सक्षम आहे.
चौकट :
सदिच्छा भेटीत उदयनराजेंशी गळा भेट...
खा. गिरीश बापट सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. साताऱ्यात आल्यावर प्रथम त्यांनी जलमंदिर येथे जाऊन खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट घेतली. तर खा. बापट यांनी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंवर स्तुतिसुमने उधळली. उदयनराजे आणि सर्व कुटुंबीय हे माझे आदर्श आहेत. मी नेहमीच जलमंदिरात भेटायला येत असतो. ही सदिच्छा भेट आहे. सामान्य माणसांशी नाळ आणि त्यांच्यावरील प्रेम हे त्यांचे गुण आहेत. या गुणांमुळे उदयनराजे हे माझे एकदम जवळचे मित्र आहेत, असेही यावेळी स्पष्ट केले.