निधी देऊनही विकासकामे करण्यात अपयश...
By admin | Published: October 30, 2016 01:01 AM2016-10-30T01:01:01+5:302016-10-30T01:01:27+5:30
पृथ्वीराज चव्हाण : जयवंत पाटील म्हणे... अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र
कऱ्हाड : ‘मुख्यमंत्री पदाच्या काळात मी शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निधीच्या प्रमाणात त्या वेगाने विकासकामे करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले, अशी टीका करीत कऱ्हाडकरांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी प्रथमच पालिका निवडणुकीत लक्ष घालत असून, यशवंत जनशक्ती आघाडीचे नेतृत्व मी स्वत: करणार आहे,’ अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, जयवंत पाटील यांनी अपप्रवृत्तीला ठेचण्यासाठी एकत्र आल्याचे सांगितले.
शनिवारी चव्हाण यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा संगीता देसाई, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, सुभाष डुबल, माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, शारदा जाधव, अरुण जाधव, दिलीप जाधव, नगरसेवक बाळासाहेब यादव, श्रीकांत मुळे, स्मिता हुलवान उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीत कऱ्हाडकरांनी भरघोस पाठिंबा दिला. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. कऱ्हाडकरांच्या विकासाबाबतीत अपेक्षा आहेत. त्यांनी स्वत:च निवडणुकीत लक्ष घालण्याची विनंती केली आहे. म्हणूनच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रथमच पालिका निवडणुकीचे नेतृत्व करणार आहे. त्या दृष्टिकोनातून यशवंत विकास आघाडी, जनशक्ती आघाडी, लोकसेवा आघाडी या सर्वांना एकत्रित करून निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. आघाडीच्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले असून, २ नोव्हेंबरला उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करणार आहोत.’
जयवंत पाटील म्हणाले, ‘पालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या अपप्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज होती. म्हणून गत वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते. त्या दृष्टिकोनातून अनेकांशी चर्चा केली. आणि अखेर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’
राजेंद्र यादव म्हणाले, ‘पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कऱ्हाडसाठी भरघोस निधी दिला. कऱ्हाडच्या विकासाबाबत त्यांच्याकडे अनेक चांगल्या संकल्पना आहेत. म्हणून आम्ही यशवंत जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत. ’ (प्रतिनिधी)
आघाडीच्या माध्यमातून निवडणूक...
काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा विचार होता. मात्र, नियोजनासाठी वेळ कमी मिळाल्याने समविचारी लोकांना एकत्र करून आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहोत.