वडूजमध्ये गर्भपातासाठी आलेल्या बनावट जोडप्याचे बिंग फुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:25 AM2020-02-13T00:25:26+5:302020-02-13T00:25:31+5:30
वडूज : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, ...
वडूज : पती-पत्नीचे खोटे नाते कागदोपत्री तयार करून एक जोडपे गर्भपात करण्यासाठी मंगळवारी वडूजमधील एका खासगी रुग्णालयात आले. मात्र, डॉक्टरांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर वडूज पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी बोगस जोडपे रुग्णालयात येताच पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूज येथील एका खासगी रुग्णालयात मंगळवारी (दि. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले. संजय भांडवलकर (रा. पाचवड, ता. माण) याने त्याची पत्नी गर्भवती असून, ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे आम्हाला सध्या अपत्य नको असल्याचे त्याने डॉ. वेदिका माने यांना सांगितले. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली असता तीन महिन्यांचा जिवंत गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना दुसºया दिवशी बुधवारी रुग्णालयात येण्यास सांगितले. बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भांडवलकर दाम्पत्य रुग्णालयात पुन्हा आले. त्यांना आधारकार्ड दाखविण्यास सांगितले. मात्र, प्रत्यक्ष दिसण्यावरून व आधारकार्डवरील माहितीवरून यात तफावत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. तसेच डॉ. वेदिका माने यांचे पती डॉ. विवेकानंद माने हे संजय भांडवलकर यांचा मेव्हणा राजेश सुतार यांना ओळखतात. त्यामुळे साहजिकच संजय भांडवलकर याच्या पत्नीलाही ते ओळखत होते. हा प्रकार भलताच असल्याचे डॉ. विवेकानंद यांना समजल्यानंतर त्यांनी वडूज पोलीस ठाण्यात फोन करून पोलिसांना बोलावून घेतले. पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात धाव घेऊन दोघांना पोलीस ठाण्यात नेले.
महिलेची प्रकृती बिघडली..
पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर दोघेही पती-पत्नी नसल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करून भांडवलकरला अटक केली. तर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा हवालदार विकास जाधव अधिक तपास करत आहेत.