साताऱ्यात संशयित तरुणाकडे सापडल्या बनावट नोटा

By दत्ता यादव | Published: January 6, 2024 08:50 PM2024-01-06T20:50:33+5:302024-01-06T20:51:19+5:30

पोलिसांकडून कसून चाैकशी; संशयितरीत्या फिरताना आढळला

Fake notes found with suspected youth in Satara | साताऱ्यात संशयित तरुणाकडे सापडल्या बनावट नोटा

साताऱ्यात संशयित तरुणाकडे सापडल्या बनावट नोटा

सातारा : येथील शाहूपुरी चौक ते आंबेदरे रस्त्यावर संशयितरीत्या फिरणाऱ्या एका तरुणाकडे दोनशे रुपयांच्या तब्बल ९५ बनावट नोटा सापडल्या. या नोटा तो कोणाला विकणार होता, हे अद्याप समोर आले नसून पोलिस त्याच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. ही कारवाई दि. ५ रोजी सायंकाळी चार वाजता करण्यात आली.

उमेश विठ्ठल वाडकर (वय २९, रा. भैरवनाथ सोसायटी, गडकरआळी, सातारा, मूळ रा. निझरे, ता. जावळी, जि. सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे रोहित निकम हे दि. ५ रोजी सायंकाळी चार वाजता शाहूपुरी चाैक ते आंबेदरे रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना उमेश वाडकर हा संशयितरीत्या फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याची चाैकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे त्याचा संशय बळावल्याने त्याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्या खिशात दोनशे रुपयांच्या ९५ बनावट नोटा आढळून आल्या. त्याने या नोटा कुठे प्रिंट केल्या, यापूर्वी बनावट नोटा त्याने साताऱ्यात कुठे-कुठे खपविल्या, याचा तपास आता पोलिस करत आहेत. शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले असून, पोलिस उपनिरीक्षक धनाजी देवकर हे अधिक तपास करीत आहेत.

दोन वर्षातील  ही दुसरी घटना

 बनावट नोटा तयार करण्यासाठी उमेश वाडकर याच्यासोबत आणखी कोणी आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, साताऱ्यात दोन वर्षांपूर्वी  सैदापूरच्या हद्दीत एका तरुणाकडे बनावट नोटा आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता दुसऱ्यांदा हा प्रकार साताऱ्यात घडला आहे. 

Web Title: Fake notes found with suspected youth in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.