साताऱ्यात तरूणाकडे सापडल्या बनावट नोटा; पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू
By दत्ता यादव | Published: December 26, 2022 07:34 PM2022-12-26T19:34:27+5:302022-12-26T19:34:35+5:30
एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणाकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
सातारा : एका हाॅटेलमध्ये काम करणाऱ्या तरूणाकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या नोटा संबंधित युवकाने कोठे तयार केल्या कीकोणी त्याला दिल्या, हे अद्याप समोर आले नसून पोलिस त्याच्याकडे कसून चाैकशी करीत आहेत.
शेखर नानासाहेब थोरात (वय २९, रा. चंदननगर, कोडोली सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महामार्गालगत असलेल्या डीमार्टजवळील ब्रीजजवळ एका तरूण येणार असून, त्या तरूणाकडेबनावट नोटा असल्याची माहिती स`थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हवालदार गणेश कचरे यांना कारवार्इच्या सूचना दिल्या. रविवारी दुपारी १२वाजता शेखर थोरात हा तेथे आला असता गणेश कचरे यांनी त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे दोनशे रुपयांच्या १२ बनावट नोटा सापडल्या. त्याला स`थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याने या नोटा स्वत:हून छापल्या आहेत की अन्य कोणाकडून घेतल्या आहेत, हे अद्याप त्याच्या चाैकशीतून समोर आले नाही. पुढील तपासासाठी त्याला सातारा तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दि.२८ पर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर हे अधिक तपास करीत आहेत.
‘त्याने’ होमगार्ड म्हणूनही काम केलयं
शेखर थोरात याने यापूर्वी काही वर्षे होमगार्ड म्हणून काम केले होते. तसेच सध्या तो साताऱ्यातील एका हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करत आहे. त्याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले आहे. अशी एकंदरीत त्याची पार्श्वभूमी असताना त्याने या नोटा कोठून आणल्या, हे मात्र, गुलदस्त्यातच आहे.
नोटा खपविण्यासाठी तो सायंकाळी घराबाहेर पडायचा
शेखर थोरात हा कोडोली चंदननगर परिसरामध्ये वास्तव्यास आहे. त्याच्याजवळ असलेल्या बनावट नोटा तो खपविण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडायचा. या नोटा त्याने विशेषत: कोडोली, चंदननगर परिसरातच खपविल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. रात्री या नोटा देऊन तो बऱ्याच वस्तू खरेदी करायचा.
पोलिस पोहोचणार मुळापर्यंत...
शेखर थोरात याने या बनावट नोटा कोठून आणल्या, हे तपासण्यासाठी पोलिस मुळापर्यंत तपास करणार आहेत. त्याच्या मोबाइलचे काॅल डिटेल्स, त्याचे मित्र कोण, कोणत्या दुकानात त्याने या नोटा खपवून वस्तू खरेदी केल्या. त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासण्यात आले येणार आहे.