फलटणकरांना यंदा ऊस गोड!
By admin | Published: September 24, 2015 08:37 PM2015-09-24T20:37:41+5:302015-09-25T00:08:25+5:30
चांगला दर मिळण्याची शक्यता : दोन कारखान्यांमधील स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक सुखावले
नसीर शिकलगार- फलटण तालुक्यात पुढील महिन्यात ऊस हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर व दोन नवीन साखर कारखाने सुरू होत असताना श्रीराम सहकारी साखर कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर दिल्याने ऊसदराची स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे चालू हंगामात चांगला दर मिळण्याच्या ऊस उत्पादकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
फलटण तालुक्यात उसाचे प्रचंड उत्पादन होत असते. या हंगामात सुमारे १८ लाख मेट्रिक टन उस उभा आहे. तालुक्यात श्रीराम साखर कारखाना व न्यू फलटण शुगर वर्क्स हे दोन कारखाने आहेत. या दोन कारखान्याची गाळपाची क्षमता पाहता मुबलक प्रमाणात ऊस यापूर्वी बारामती, इंदापूर, माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांकडे जात होता. शेजारील कारखाने जो देतील, तो दर पदरात पाडून घेण्याशिवाय ऊस उत्पादकांना पर्याय नव्हता. अनेकांनी ऊस शेजारील कारखान्यांना कवडीमोल दराने दिला.
मागील हंगामात साखरेचे दर कोसळल्याने साखर कारखान्यांचेच नियोजन कोसळले गेले. ऊस उत्पादकांच्या दराच्या अपेक्षा पूर्ण करणे अवघड होत गेले. तालुक्यातील दोन्ही कारखान्यांनी १८०० रुपयांच्या दरम्यान दर दिला. दोन्ही कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे अशक्य होत होते. अशातच चालू हंगामात दोन नवीन खासगी साखर कारखाने चालू होत आहे. त्या कारखान्यांच्या स्पर्धेला तोंड देणे श्रीराम व न्यू फलटण शुगरला क्रमप्राप्त आहे. आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व ऊस उत्पादकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी अडचणीत असलेल्या श्रीराम कारखान्याने एफआरपीप्रमाणे प्रतिटन २२०७ रुपये दर जाहीर करुन नीरा खोऱ्यात खळबळ उडवून दिली आहे.
एफआरपीएवढा दर मिळत असल्याने अडचणीतील ऊस उत्पादकांकडून समाधान व्यक्त होत असताना चालू हंगामात खासगी दोन कारखाने चालू होत असल्याने या हंगामात चारपैकी कोणत्या कारखान्याला ऊस द्यायचा, याचा पर्याय शेतकऱ्यांना निर्माण झाला आहे. यापूर्वी तालुक्याबाहेरील ऊस उत्पादकांकडून होणारी गळचेपी या हंगामात थांबणार आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी चारही कारखान्यांना चांगला दर द्यावा लागणार असल्याने तालुक्यातील ऊसउत्पादक खुशीत आहे.
सगळे काही स्पर्धेत टिकण्यासाठी ...
नीरा खोऱ्यात माळेगाव, सोतेश्वर यासारखे मोठे कारखाने एफआरपी देऊ शकत नसताना ‘श्रीराम’ने एफआरपीप्रमाणे दर देऊन दराची स्पर्धा निर्माण केली आहे. ‘श्रीराम’ने एफआरपी दिल्याने आता सगळ्यांच्या नजरा साखरवाडीच्या ‘न्यू फलटण’कडे लागल्या आहेत. न्यू फलटणने आतापर्यंत १८०० प्रमाणे दर दिला आहे. या कारखान्याची एफआरपी २१०० रुपयांच्या दरम्यान बसत असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी न्यू फलटणही एक ते दोन दिवसात एफआरपीप्रमाणे दर जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.