टोमॅटोची लाली उतरली; ४० रुपये किलो; महिन्यानंतर सर्वसामान्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:04 PM2023-08-21T12:04:06+5:302023-08-21T12:04:17+5:30
कांदा महाग होत चालला
सातारा : सातारा शहरात महिन्यानंतर टोमॅटोची लाली उतरली. बाजार समितीत किलोला २० ते ३० रुपये दर मिळाला. त्यामुळे मंडईत किलोचा दर ४० पर्यंत खाली आल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर कांदा महाग होत चालला आहे. बाजार समितीत क्विंटलला २६०० पर्यंत भाव आला. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून आले.
सातारा बाजार समितीत दररोज पालेभाज्या, फळभाज्यांची मोठी आवक होते. तसेच फळेही येतात. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढली आहे. त्यातच रविवारी अधिक प्रमाणात शेतमाल येतो. या रविवारी ६०० क्विंटल फळभाज्यांची तर कांद्याची ३८९ क्विंटलची आवक झाली. तर आले १२ क्विंटल आले होते. बाजार समितीत कांद्याची आवक चांगली असून, दरात वाढ झाली आहे. रविवारी कांद्याला क्विंटलला २०० पासून २६०० पर्यंत दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर सातारा बाजार समितीत वांग्याच्या दरात आणखी उतार आला. १० किलोला १५० ते २५० रुपये दर मिळाला. तर टोमॅटोला १० किलोला २०० ते ३०० रुपयेच दर मिळाला. मागील रविवारी ३०० ते ६०० रुपये भाव मिळाला होता.
टोमॅटोचा दर निम्म्याने कमी झाला आहे. भाजी मंडईतही दरात उतार आल्यामुळे एक महिन्यानंतर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. तर फ्लॉवरला १० किलोला २०० ते ३०० रुपये दर मिळाला. फ्लाॅवरचा दर स्थिर राहिला आहे. त्याचबरोबर आले दरात थोडा उतार आला आहे. रविवारी आल्याला क्विंटलला ८ हजारांपासून ११ हजारांपर्यंत दर मिळाला. तर लसणाचा दर स्थिर असून, क्विंटलला ८ ते १४ हजारांपर्यंत दर आला. त्याचबरोबर वाटाण्याचा दर कमी झाला आहे. क्विंटलला तीन ते साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला. गवारचा दर स्थिर आहे. रविवारी गवारला क्विंटलला ३ ते ४ हजार दर आला. तर पावट्याला क्विंटलला साडेतीन हजारांपर्यंत दर मिळाला.
शेवगा शेंग स्थिर...
सातारा बाजार समितीत शेवगा शेंगचा दर स्थिर आहे. क्विंटलला तीन हजारांपर्यंत दर आला. तर कारले आणि दोडक्याचा भाव कमी झाला आहे. कारल्याला १० किलोला अवघा १०० ते २०० आणि दोडक्याला १५० ते २५० रुपये दर मिळाला. तसेच बटाट्याला १० किलोला १३० ते १६० रुपये दर आला. हिरव्या मिरचीला १० किलोला ३०० ते ४०० रुपये दर आला. मिरची दरात थोडा उतार आला आहे तर ढब्बूही स्वस्त झाला असून, २०० ते ३०० आणि भेंडीला १५० ते २५० रुपये दर मिळाला. काकडीही स्वस्त झाली असून, १० किलोला अवघा ५० ते ८० रुपये दर मिळाला.