वठलेले झाडही सांगू लागले सर्वशिक्षा अभियानाचे महत्त्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:00+5:302021-03-27T04:40:00+5:30
वाई : वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व ...
वाई : वाई येथील द्रविड हायस्कूलच्या आवारातील वठलेल्या झाडातून पेन्सिलची प्रतिकृती साकारण्यात आली असून ती येणाऱ्या जाणाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानाचा संदेश देत आहे. मुख्याध्यापक नागेश मोने यांच्या भन्नाट डोक्यातून ही कल्पना प्रत्यक्षात उतरली. ही पेन्सिल सध्या सर्वांचेच लक्ष आकर्षून घेत आहे.
चलो शिक्षा अभियानचे चिन्ह असलेली ही पेन्सिल. परंतु, एका वठलेल्या झाडातून तिची सुंदर प्रतिकृती तयार होईल याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. एरवी वठलेले झाड म्हटले की, ते तोडायचे आणि त्याचा वापर चुलीसाठी, बंब पेटविण्यासाठी करायचा एवढेच माहीत. परंतु, द्रविड हायस्कूल नेहमीच समाजाला प्रेरणा देणारे उपक्रम राबवित असते. शाळेच्या आवारात असलेले हे झाड तोडून टाकण्यापेक्षा त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल, असे काहीतरी घडविण्याची कल्पना नागेश मोने यांना आली. त्यातूनच ही पेन्सिलची सुंदर प्रतिकृती उदयास आली.
पेन्सिलची ही प्रतिकृती शाळेच्या आवारात शोभून दिसत आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनाही प्रेरणा मिळेल, की वठलेल्या झाडातूनही काहीतरी निर्माण होऊ शकते. अशी कल्पकता वाढीस लागावी, असाही उद्देश यामागे आहे. उपक्रमास विद्यालयातील शिक्षकांचेही सहकार्य लाभले.
चौकट :
वठलेल्या झाडाचा काहीतरी विधायक उपयोग करण्याच्या हेतूने शैक्षणिक साधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. समग्र शिक्षण अभियानात पेन्सिल हे शिक्षणाचे, प्रगतीचे प्रतीक मानले जाते. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ही पेन्सिल विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारी ठरत आहे.
- नागेश मोने,
मुख्याध्यापक, द्रविड हायस्कूल वाई
फोटो २६वाई-पेन्सिल
वाई येथील द्रविड हायस्कूलमधील वठलेल्या झाडातून पेन्सिल साकारण्यात आली आहे. (छाया : पांडुरंग भिलारे)