सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
By Admin | Published: March 27, 2016 12:06 AM2016-03-27T00:06:22+5:302016-03-27T00:16:23+5:30
नगरपंचायत निवडणूक : प्रचारात कॉँग्रेस, भाजपाची आघाडी; सेना राष्ट्रवादीत संभ्रमावस्था
लोणंद : लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असून, नगरपंचायत निर्मितीवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. दरम्यान, लोणंद नगरपंचायतीच्या प्रचारामध्ये काँग्रेस, भाजप यांनी आघाडी घेतली असून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या संभ्रमावस्था दिसून येत आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे. सतरा प्रभागांतून काँग्रेस व भाजप उमेदवार निश्चित झाले असताना व प्रचाराचा शुभारंभ करत जोरदार शक्तीप्रदर्शन होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेने कडून उमेदवारी निश्चित न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था दिसून येत आहे.
काँग्रेसकडून लोणंद नगरपंचायत निर्मितीवरून सोशल मीडियावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार शरसंधान सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसने लोणंद नगरपंचायत निर्मितीसाठी केलेली अडवणूक बाबतच्या स्थायी समितीचा ठरावाच्या व उच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रती वितरण करत प्रचाराचा मुद्दा बनवत रान उठवत राष्ट्रवादी यांना खिंडीत गाठले आहे. काँग्रेसकडून लोणंदकरांच्या आस्थेचा प्रश्न असलेल्या २४ बाय ७ या पिण्याच्या पाण्याचा जागेचा प्रश्न राष्ट्रवादीला सोडवता आला नसल्याचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडवून दिली आहे. याबाबत राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युतर दिले जात आहे. (वार्ताहर)