लबाड पालकमंत्र्यांचा निधी उल्लू बनवितोय!
By Admin | Published: October 23, 2015 10:05 PM2015-10-23T22:05:12+5:302015-10-24T00:56:21+5:30
जयकुमार गोरे : विजय शिवतारेंवर हल्लाबोल; जिहे-कटापूर योजना पूर्ण करू म्हणणाऱ्यांकडून निधीची माहिती खोटी
सातारा : ‘जिल्ह्याचे पालकमंत्री लढवय्ये आहेत. त्यांनी पुरंदरला पाणी आणले. वर्षापूर्वी तर त्यांनी वर्षभरात माण-खटाव तालुक्यांला जिहे-कटापूर योजनेचे पाणी पोहोचविणार, अशी घोषणा केली होती. आता तर ते या योजनेसाठी निधी मंजूर केला म्हणून सांगत आहेत. सध्याचे पालकमंत्री हे प्रत्येक गोष्ट चुकीची व खोटी सांगत आहेत. हे पालकमंत्री म्हणजे लोकांना उल्लू बनविणारे आणि लबाड आहेत, असा पालकमंत्री जिल्ह्याला कधीच मिळाला नव्हता,’ असा हल्लाबोल आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी सध्या गेल्या सहा महिन्यांपासून जिल्हा बँकेतील माहिती घेत आहे. येथून पुढे बँकेतील प्रत्येक बैठकीनंतर याविषयी पत्रकारांशी बोलू, असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली.
दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेसाठी ६२ कोटंचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. त्यावर टीकाटिप्पणी करण्यासाठी आमदार गोरे यांनी सातारच्या विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री शिवतारे यांच्यावर हल्लाबोल करतानाच चौफेर टीकाही केली.
आमदार गोरे म्हणाले, ‘मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी वर्षभरापूर्वी जिहे-कटापूर योजना पूर्ण करू, असे सांगितले होते. पण, अधिकाऱ्यांच्या मतानुसार या योजनेला अत्यल्प निधी मिळाला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी मी १०४ कोटींच्या निधीची तरतूद करून आणली होती. तर गेल्या १६ वर्षांत या योजनेवर ८२ कोटी रुपये खर्च झाले, तर गेल्या साडेतीन वर्षांत २९८ कोटी रुपये खर्ची घातले. सध्या या योजनेसाठी पालकमंत्री निधी मंजूर झाला आहे, असे सांगत आहेत. ते पूर्णपणे खोटे आहे. कारण, महामंडळाकडे पैसे शिल्लक आहेत. त्यामधून निधी देण्यात आलेला आहे.
खरेतर पालकमंत्री हे लोकांना उल्लू बनवत आहेत, असे लबाड पालकमंत्री मी प्रथमच पाहत आहे. यापूर्वीचे दोन पालकमंत्री असेच या योजनेसाठी आश्वासन देऊन गेले. एकाने तर या पृथ्वीच्या अंतापर्यंत माण-खटावला पाणी देता येणार नाही, असे सांगितले होते. सध्याच्या पालकमंत्र्यांकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी लबाडी करू नये. ही योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर राहू,’ असा सल्लाही आमदार गोरे यांनी दिला. (प्रतिनिधी)
जयकुमार गोरे म्हणाले....
मुख्यमंत्र्यांना शेती, सिंचन योजनेचे काहीच कळत नाही
पालकमंत्र्यांनी चुकीची माहिती देऊ नये, तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात
पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात आठ दिवसांतून एकदा यावे
राजकारण न करता पाणी योजना पूर्ण झाल्या पाहिजेत
जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजसंदर्भातील घोषणा पूर्ण करावी
मागचं सरकार शहाणं नव्हतं, तुम्ही शहाणे आहात तर काय करणार, ते सांगा.
माणमधील सर्व नेते मोडीत...
या पत्रकार परिषदेदरम्यान, माण तालुक्यातील राजकारणासंदर्भात त्यांनी भाष्य केले. माणमधील सर्व नेते मोडीत निघाले आहेत. त्यामुळे अनेकजण माझ्याकडे येत आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस संपली आहे. ‘रासप’ कुठे आहे, ते माहीत नाही. हळूहळू सर्व संपतील, असा आशावाद आमदार गोरे यांनी व्यक्त केला.