‘लॉकडाऊन’मध्ये वाढला कौटुंबिक कलह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:36 AM2021-05-17T04:36:51+5:302021-05-17T04:36:51+5:30

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत हा वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद ...

Family quarrel escalates in 'Lockdown'! | ‘लॉकडाऊन’मध्ये वाढला कौटुंबिक कलह!

‘लॉकडाऊन’मध्ये वाढला कौटुंबिक कलह!

Next

कऱ्हाड : संसार म्हटलं की वाद होणारच; पण जोपर्यंत हा वाद चार भिंतीत असतो तोपर्यंत घराला घरपण असतं. वाद पोलीस ठाण्यात पोहोचला तर कुटुंबाची वाताहत होते. गतवर्षीपासून ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कौटुंबिक कलहाच्या तक्रारी वाढल्या आहेत. पोलीस ठाण्यातील विशेष कक्षानेही त्याला दुजोरा दिला असून आर्थिक ओढाताण, बंदिस्त जीवनशैली, मानसिक घुसमट यासह अन्य कारणांनी हे वाद होत असल्याचे तक्रारींवरून दिसून येते.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात कौटुंबिक वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी ‘कौटुंबिक विशेष कक्ष’ कार्यरत आहे. पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या कौटुंबिक तक्रारी सुरुवातीला या कक्षाकडे वर्ग केल्या जातात. तेथे तक्रारदार व त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे समुपदेशन केले जाते. त्यातून तुटण्याच्या मार्गावर असलेली नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जातो. शहर पोलीस ठाण्यातील या कक्षाकडे दाखल होणाऱ्या तक्रारींपैकी बहुतांश तक्रारी पती-पत्नीमधील वादाच्या असतात. मात्र, गत वर्षभरात पती-पत्नीमधील वादासह कुटुंबातील अन्य नात्यांतील वादही या कक्षापर्यंत पोहोचलेत. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत या तक्रारींचे प्रमाण वाढल्याचे समुपदेशक सांगतात.

‘लॉकडाऊन’मध्ये प्रत्येकाला घरात रहावे लागले. यावेळी मतमतांतरे, भिन्न विचारांमुळे काही कुटुंबात विसंवाद घडलेत. तसेच या कालावधीत प्रत्येकाला आर्थिक ओढाताण सहन करावी लागली. आर्थिक कारणास्तवही काही कुटुंबात वाद झालेत. वैद्यकीय कारणास्तवही कुटुंबातील वातावरण तणावपूर्ण बनून त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर झाल्याचे काही तक्रारींमधून दिसत असल्याचे समुपदेशक सविता खवळे यांनी सांगीतले.

- चौकट

वर्षभरातील तक्रारी

एकूण दाखल : १४६

तडजोड झालेल्या : ९३

संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या : २२

कायदेशीर सल्लागारांकडे पाठविलेल्या : २४

पोलिसांकडे वर्ग केलेल्या : २

प्रतिसाद न मिळालेल्या : ३

इतर संस्थेकडे पाठविलेल्या : २

- चौकट

तक्रारींमधील कारणे

हुंडा मागणी : २

ताणतणाव : ४

संपत्तीचा वाद : ३

कौटुंबिक हिंसाचार : ३५

मुलाकडून होणारा त्रास : २

सुनेकडून होणारा त्रास : १

शारीरीक, मानसिक छळ : १४

व्यक्तिमत्वातील दोष : १

संसारात हस्तक्षेप : ३

व्यसनाधीनता : १२

पुनर्विवाह : ३

संशय वृत्ती : ७

पती-पत्नीचे दुर्लक्ष : ३९

- चौकट

२२ विवाहितांनी घेतला कायद्याचा आधार

पती आणि पत्नीमधील वाद सामोपचाराने मिटत नसेल. आणि तक्रारदार पत्नीला घटस्फोट न घेता, विभक्त न होताच कायद्याचे संरक्षण घ्यायचे असेल तर कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये तिला संरक्षण मिळते. महिला व बालकल्याणच्यावतीने त्यासाठी संरक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. कऱ्हाडातील २२ तक्रारदार विवाहितांनी गत वर्षभरात या कायद्याचे संरक्षण घेतले आहे.

- कोट

पती आणि पत्नीमध्ये वाद होणं स्वाभाविक आहे; पण हा वाद टोकाला जाऊ नये, याची खबरदारी दोघांनीही घ्यायला हवी. दोघांचा संसार सुखाचा व्हावा, यामध्ये कुटुंबीयांची भूमिकाही महत्त्वाची आहे. गत वर्षभरात तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्या तक्रारी सामोपचाराने मिटविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

- सविता खवळे

समुपदेशक, कौटुंबिक विशेष कक्ष

फोटो : १६केआरडी०१

कॅप्शन : प्रतीकात्मक

Web Title: Family quarrel escalates in 'Lockdown'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.