फलटण तालुक्यात गणरायांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:45+5:302021-09-21T04:44:45+5:30
फलटण : फलटण शहरासह तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भक्तीपूर्ण वातावरणात विघ्नहर्ताला निरोप देत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. ...
फलटण : फलटण शहरासह तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी भक्तीपूर्ण वातावरणात विघ्नहर्ताला निरोप देत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गेली दोन वर्षे श्री गणेशाचे आगमन व विसर्जन कोठेही जल्लोष, उत्साह, कार्यक्रम, उपक्रम शिवाय प्रशासनाच्या निर्णयानुसार परंतु परंपरा सांभाळून करण्यात येत आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११० सार्वजनिक व सुमारे ७ हजार घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती. त्यापैकी ७७ सार्वजनिक मंडळे फलटण शहरातील असून बहुसंख्य मंडळांनी दुपारी तीन पर्यंत मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत कोणत्याही वाद्यांशिवाय विसर्जन मिरवणुका काढल्या. उर्वरित मंडळांनी सायंकाळी सात पर्यंत मिरवणुका काढून नीरा उजवा कालव्यामध्ये पंढरपूर, बारामती व जिंती पूल येथे विसर्जन केले. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, ठाकुरकी, झिरपवाडी येथील मंडळांनी स्थानिक व्यवस्था नुसार गणेश मूर्तींचे विसर्जन केले.
घरगुती मूर्तींसाठी नगरपरिषदेने नीरा उजवा कालव्यालगत यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर, प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आणि कासार बावडी येथील विहिरीत विसर्जन व्यवस्था केली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून शहराच्या काही भागातून गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनाची व्यवस्था केली होती.
ग्रामीण भागात २१८ व लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८१ अशा एकूण २९९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन परंपरागत ठिकाणी तेथील व्यवस्था नुसार शांततेत करण्यात आले. तर घरगुती सुमारे १० हजारांवर गणेश मूर्ती काहींनी ३ ऱ्या, काहींनी ५ व्या दिवशी आणि उर्वरित काल रविवारी करण्यात आले.