प्रतिष्ठेच्या लढतीत आता अपक्षांची भर !
By admin | Published: July 31, 2015 09:22 PM2015-07-31T21:22:44+5:302015-07-31T21:22:44+5:30
तारळे ग्रामपंचायत धूमशान : देसाई-पाटणकर गट आमने-सामने; उमेदवारांकडून बेरजेचे राजकारण
एकनाथ माळी - तारळे -देसाई-पाटणकर गटांसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या तारळे ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. नेते, उमेदवार, कार्यकर्ते पायाला भिंगरी बांधून प्रचारात गुंतले आहेत. प्रत्यक्ष मतदारांच्या घराघरांत जाऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा दोन्ही गटांचा प्रयत्न सुरू आहे. गुप्त बैठका झडत आहेत. प्रत्येकजण भाऊबंदकीच्या बेरजेच्या राजकारणात गुंतला असून, बेरजेच्या राजकारणात प्रत्येकजण वेगवेगळे आडाखे बांधत आहे.
पंधरा उमेदवार असणाऱ्या तारळे ग्रामपंचायतीमध्ये यंदा एक नवीन वॉर्ड वाढून सतरा सदस्य सहा वॉर्डातून निवडून येणार आहेत. गेले अनेक वर्षे ग्रामपंचायतीवर देसाई गटाची सत्ता अबाधित होती. गतवेळी पाटणकर गटाने ग्रामपंचायत ताब्यात घेत देसाई गटाला अनपेक्षित धक्का दिला होता. त्याचा वचपा काढण्यासाठी देसाई गटाने कंबर कसली आहे. त्यामुळे सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान पाटणकर गटासमोर असून, दोन्ही गटांकडून ग्रामपंचायतीवर ताबा सांगण्यात येत आहे. अनेक कारणांनी ही निवडणूक दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. प्रचाराची रणधुमाळीही सुरू झाली आहे.
उमेदवार निवडताना बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न झाले असले तरी यंदा अपक्ष उमेदवारांनी दंड थोपटल्याने फायदा कुणाला व तोटा कुणाला, हे थोड्याच दिवसांत समोर येईल. अपक्षांमुळे निवडणुकीत चांगलाच रंग भरला आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी तरुण नेतृत्वाला वाव दिल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी तरुणांची फौजच निवडणूक प्रचारात सक्रिय झाली आहे. रात्री उशिरापर्यंत प्रचारात विविध विषय चर्चेत येत आहेत. ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.
विविध कारणांनी प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणूक प्रचाराने वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार, कार्यकर्ते घरोघरी जाऊन मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात आहेत.
भाऊबंदीकीवरच प्रचाराचा जोर...
भाऊबंधकीवरच प्रचाराचा जोर आहे. उमेदवार देताना दोन्ही गटांनी बंडखोरी टाळण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न केला असला तरीही वॉर्ड नं. तीनमध्ये देसाई गटातील दोन इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथील निवडणूक गुंतागुंतीची झाली आहे. मतदार कुणाला कौल देतात, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.