रस्त्याच्या ठेकेदाराकडून शेतकऱ्याला धमकी
By admin | Published: December 17, 2014 09:33 PM2014-12-17T21:33:54+5:302014-12-17T23:00:49+5:30
ढेबेवाडी पोलिसांत फिर्याद : रस्त्याचे काम बंद पाडल्याचे कारण
सणबूर : जिंती-मोडकवाडी, ता़ पाटण रस्त्याच्या बांधकामाचा ठेका घेतलेला ठेकेदार फोनवरून धमक्या शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची फिर्याद रमेश श्रीपती साळुंखे-पाटील यांनी ढेबेवाडी पोलिसांत दिली आहे़
या घटनेची माहिती अशी की, जिंतीकडून मोडकवाडीकडे जाणारा रस्ता एक एकर क्षेत्रातून रमेश साळुंखे यांच्या शेतातून जात आहे़ या रस्त्यासंदर्भात जमीन मालकाशी कोणतीही चर्चा न करता सुरुवातीच्या ठेकेदाराने जबरदस्तीने रस्त्याचे काम सुरू केले होते़
त्यावेळी रमेश साळुंखे यांनी न्यायालयात धाव घेऊन रस्त्याचे काम न्यायालयाच्या आदेशाने बंद पाडले. या रस्त्याबाबत निकाल रमेश साळुंखे यांच्या बाजूने लागला आहे़
त्यानंतर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, सध्या या रस्त्याच्या कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने संबंधित शेतमालकाशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता मोबाईलवर सतत धमक्या देत आहे़ ‘तू रस्ता आडवून दाखव तुला ठार करतो. माझा वरपर्यंत वशिला आहे़ तुला सोडणार नाही,’ अशी धमकी संबंधित ठेकेदाराकडून दिली जात आहे.
‘रस्त्याबाबत मी पाटण व कऱ्हाड न्यायालयात दावा दाखल केला होता़ या दोन्ही दाव्यांचा निकाल माझ्या बाजूनेच लागलेला असताना देखील मला दमदाटी करून रस्त्याचे काम चालू करण्याचे उद्योग सुरू आहेत़ हा रस्ता व्हावा, अशी माझी अपेक्षा होती़ मात्र गावातील पुढाऱ्यांनी आमच्या कुटुंबातील कोणाशी चर्चा केली नाही किंवा बोललेही नाही़ केवळ दबाव टाकून रस्ता करण्याचा त्यांचा हेतू आहे़ संबंधित जमिनीबाबत न्यायालयात माझा वेळ-पैैसा गेल्याने यापुढे मी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता माझ्या शेतातून रस्ता जाऊ देणार नाही,’ अशी तक्रार साळुंखे यांनी पोलिसांत दिली आहे. (वार्ताहर)