शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:42 AM2021-05-25T04:42:53+5:302021-05-25T04:42:53+5:30

वरकुटे-मलवडी : शेती पिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून रासायनिक खताचा बेसुमार वापर केला जात असल्याने, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास ...

Farm manure is getting gold price! | शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव !

शेणखताला मिळतोय सोन्याचा भाव !

Next

वरकुटे-मलवडी : शेती पिकवण्यासाठी अनेक वर्षांपासून रासायनिक खताचा बेसुमार वापर केला जात असल्याने, जमिनीच्या सुपीकतेवर परिणाम होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकरी आता शेणखताकडे वळले आहेत. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे प्रगतशील शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे शेणखताला सोन्याचा भाव आला आहे. एक ब्रास शेणखताच्या ट्रॉलीला सहा हजारांहून जास्त दर मोजावा लागत आहे.

सेंद्रिय शेतीसाठी शेणखत हे गाई-म्हशींचे शेण, मलमूत्र, गोठ्यातील पालापाचोळा यापासून तयार होते. त्यामुळे त्यात नत्र, स्फुरद, पालाश असे घटक समाविष्ट असतात. सेंद्रियखत हे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. मातीतील जैविक घटकांच्या वाढीसाठी व सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविण्यासाठी कुजलेले शेणखत अत्यंत फायदेशीर ठरते. शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मामध्ये लक्षणीय बदल होतात. विषमुक्त शेती आणि रोगमुक्त अन्न मिळविण्यासाठी काही प्रमाणात शेतकरी आता शेणखताचा वापर करू लागले आहेत.

माहिती तंत्रज्ञानामुळे कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काही वर्षांपासून रासायनिक खताचा वापर वाढला होता. त्यामुळे शेतीची मोठ्या प्रमाणात हानी होऊन त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो. ग्रामीण भागातही पशुधनांची संख्या कमी झाल्याने, शेणखताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे काही शेतकरी पशुधन असलेल्या शेतकऱ्यांकडे अगोदरच शेणखताची मागणी नोंदवत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातीलच नव्हे; तर प्रयोगशील शेतकरीही शेणखताचा वापर करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

शेणखताचा वापर करून घेतलेल्या उत्पादनाला बाजारपेठेत मागणी असून, दरही चांगला मिळत आहे. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे विनाकारण पिकांची मोठ्या प्रमाणात वाढ होते. त्याचबरोबर जमिनीचा पोत खराब होतो. जमिनीवर क्षार जमा होऊन शेती नापीक बनते. याशिवाय, रासायनिक खतातील १० टक्केच अन्नद्रव्य पिकाला मिळतात. सूर्याच्या उष्णतेमुळे उर्वरित अन्नद्रव्याचा ऱ्हास होतो. रासायनिक खते जमिनीतील उपयोगी जीवाणूंना अपायकारक ठरतात. त्यामुळे शेतातील जमिनीवर मोठा परिणाम होतो. सध्या रासायनिक खताच्या दरात वाढ झाली आहे.

ट्रॉलीसाठी सहा हजार रुपये

साधारणतः ५० किलोच्या रासायनिक खताची गोणी १२५० रुपयांपासून मिळते. दुसरीकडे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीभर शेणखतासाठी सहा हजार रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. शेणखत शेतीसाठी सर्वाधिक उपयुक्त असल्यानेे प्रयोगशील आणि अभ्यासू शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत.

कोट :

शेणखतामुळे जमीन सुपीक होते. नत्राचा पुरवठा वाढतो. कॅल्शियम, मॅग्नेशिअम, झिंक, फॉस्फरस, स्फुरद, बोरॉन, गंधक अशी सूक्ष्म मूलद्रव्ये पिकांना सहज उपलब्ध होतात. याशिवाय, नत्र, स्फुरद, पालाश हे भरपूर प्रमाणात उपलब्ध होते. सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. माती भुसभुशीत होऊन हवा, पाण्याचे वहन झाल्याने जमिनीची सुपिकता चांगली वाढते.

अशोक शिंगाडे,

कृषी पर्यवेक्षक.

Web Title: Farm manure is getting gold price!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.