लॉकडाऊनमध्ये शेतरस्ते पुन्हा प्रकटले!, उभारली सत्कार्याची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 02:11 PM2021-04-29T14:11:31+5:302021-04-29T14:14:18+5:30
CoronaVirus Chaphal Road Satara : नानेगाव खुर्द ता. पाटण गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत लॉकडाऊन काळातील वेळ सतकारणी लावला आहे. लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरु केले आहे. ह्यगांव ते शेत पोहोच रस्ताह्ण ही योजना स्वत:च तयार करत ती यशस्वीपणे राबवली आहे.
चाफळ : नानेगाव खुर्द ता. पाटण गावातील शेतकऱ्यांनी एकत्रीत येत लॉकडाऊन काळातील वेळ सतकारणी लावला आहे. लोकसहभागातून शेतरस्ते तयार करण्याचे काम गुढीपाडव्यापासून सुरु केले आहे. गांव ते शेत पोहोच रस्ता ही योजना स्वत:च तयार करत ती यशस्वीपणे राबवली आहे.
सध्या शेत रस्ते तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत थेट वाहन जाण्यास मदत झाली आहे. एकंदरीतच शेतापर्यंतचे रस्ते खुले झाल्याने येथील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नानेगाव खुर्द येथे शेतरस्ते गेली कित्येक वर्षे बंद होते. पावसाळा असो की उन्हाळा हे रस्ते खुले केले जात नव्हते. परिणामी शेतापर्यंत वाहन जाऊ शकत नव्हते. साहजिकच शेतीची प्रगती होत नव्हती. अशा परिस्थितीत मग करायचे तरी काय ? असा प्रश्न येथील शेतकरी बांधवांना सतावत होता.
यावर रामबाण उपाय शोधत येथील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेत गावस्तरावर मोजके शेतकरी जमले. कोरोनाचे नियम पाळत बैठक घेतली. या बैठकीत गावातील प्रत्येक शेतापर्यंत रस्ते तयार करण्याची संकल्पना रुजली गेली. व गाव ते शेत पोहोच रस्ता हि योजना ताच शेतकऱ्यांनी तयार करुन ती यशस्वीपणे राबवलीही.
प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पोहच रस्ता हवा तरच शेतीची मशागत व इतर कामे व्यवस्थीत व वेळेवर पार पडतील. रस्ते नसल्याने होणारी परवड पाहून लोकांनी सहकार्याची भूमिका पार पाडत सर्वानूमते गावातील सर्व शेतीला पोहचतील असे सर्व रस्ते खुले करण्याचा निर्णय गुढीपाढव्याच्या मुहूर्तावर घेण्यात आला. त्या दिवसापासूनच सर्व रस्ते खुले करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतीची मशागत, शेणखते देणे, पेरणी इत्यादी कामे वेळीच आणि सुलभतेने होणार आहेत.
आधुनिक शेतीचं स्वप्न सत्यात उतरणार
चाफळपासून सहा किलो मीटरवर उत्तरमांड धरणाजवळ नाणेगांव खुर्द आहे. शिक्षकांचे गाव म्हणून परिचीत असणाऱ्या या गावात साधारत: १०० हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र आहे. या गावातील प्रत्येकाच्या शेत जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ते नव्हते. पूर्वीचे हवेदावे बाजुला ठेवत येथील शेतकऱ्यांनी स्वत:च योजना तयार करत यशस्वीपणे राबवली. त्यामुळे आधुनिक शेतीचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत झाली आहे. व लाँकडाऊन काळातील वेळेचा सदोपयोगही झाला आहे.