डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गायीचा मृत्यू झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:20+5:302021-08-13T04:44:20+5:30
शिरवळ : येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. आठ महिन्यांची ...
शिरवळ : येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एक लाख पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. आठ महिन्यांची गाभण गाय मरण पावली, असा आरोप शेतकरी बाळासाहेब अहिरेकर यांनी केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, पिंपरे बुद्रुक येथील बाळासाहेब शिवाजी अहिरेकर यांच्या मालकीची आठ महिने गाभण असलेली गाय जखम झाल्याने शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचाराकरिता गुरुवार, दि. २९ रोजी दाखल केली होती. यावेळी तेथील उपस्थित डॉक्टरांनी जखमेवर उपचार करीत संबंधित गायीला महाविद्यालयामध्येच दाखल करीत गायीची एक चाचणी करण्यास सांगितले असता ती चाचणी नकारात्मक आली. यावेळी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून ४ ऑगस्टपर्यंत जखमेवर उपचार व्यवस्थित करण्यात आल्याने जखमेमध्ये सुधारणा झाली होती. दरम्यान, बाळासाहेब अहिरेकर हे शनिवारी गायीला पाहण्याकरिता व डॉक्टरांशी चर्चा करण्याकरिता आले असता त्याठिकाणी गायीची प्रकृती ढासळल्याचे निदर्शनास आले. तत्काळ याची कल्पना बाळासाहेब अहिरेकर यांनी तेथील डॉक्टरांना दूरध्वनीद्वारे दिली असता संबंधितांनी याकडे दुर्लक्ष केले. रविवारी बाळासाहेब अहिरेकर हे पुन्हा महाविद्यालयामध्ये आले असता गाय मरण पावल्याचे दिसली. यामुळे बाळासाहेब अहिरेकर यांना धक्का बसत त्यांची प्रकृती बिघडली. याबाबतची महाविद्यालयाचे चिकित्सालय प्रमुख डॉ. अनिल उलेमाले यांना दूरध्वनीद्वारे माहिती दिली. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
कोट
शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गायीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या संबंधित डॉक्टरांवर शासनाने कारवाई करावी.
- बाळासाहेब अहिरेकर, शेतकरी, पिंपरे बुद्रुक,खंडाळा
----------
मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन
शिरवळ येथील महाविद्यालयामध्ये पिंपरे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी गायीला दखल केले होते. गायीवर महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपचारही चांगल्याप्रकारे केले आहेत. संबंधित गायीच्या मृत्यूचे कारण शोधण्याकरीता शवविच्छेदन करण्यात आले आहे. याबाबत पुढील योग्य ती कार्यवाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे, अशी माहिती क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे चिकित्सालय विभाग प्रमुख डॉ. अनिल उलेमाले यांनी दिली.