उधारीच्या कारणावरून शेतकऱ्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:22 AM2021-03-30T04:22:48+5:302021-03-30T04:22:48+5:30
सातारा : जनावरांची आरोग्य तपासणी केल्यानंतरही त्याचे पैसे दिले नसल्याच्या कारणावरून देगाव येथील सहाजणांनी संगनमत करून कारंडवाडी येथील एका ...
सातारा : जनावरांची आरोग्य तपासणी केल्यानंतरही त्याचे पैसे दिले नसल्याच्या कारणावरून देगाव येथील सहाजणांनी संगनमत करून कारंडवाडी येथील एका शेतकऱ्यास लाकडी दांडके आणि दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल झाला.
बाबू चौगुले, दीपक चौगुले, संजय चौगुले, सोमनाथ चौगुले, किशोर कुऱ्हाडे, वाल्मीकी (सर्व रा. देगाव, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची, तर विजय साळुंखे असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, मारहाण करणाऱ्यांमध्ये एक खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरही आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, विजय विश्वनाथ साळुंखे (वय ३०, रा. कारंडवाडी, ता. सातारा) हा शेतकरी असून, त्याने काही दिवसांपूर्वी खासगी पशुवैद्यकीय डॉ. बाबू रघुनाथ चौगुले याच्याकडून जनावरांची वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. त्याचे पैसे विजय याने दिले नव्हते. ते पैसे परत देण्याच्या कारणावरून बाबू चौगुले, दीपक हेमंत चौगुले, संजय हेमंत चौगुले, सोमनाथ चौगुले, किशोर कुऱ्हाडे, वाल्मीकी या सहाजणांनी विजय याला लाकडी दांडक्याने पाठीवर आणि हातापायावर मारहाण केली. यावेळी संजय चौगुले यांनी विजयला दगडाने मारहाण केल्याने त्याच्या डाव्या डोळ्याजवळ दुखापत झाली. यानंतर पुन्हा या सहाजणांनी हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विजयला जखमी केले. ही घटना शनिवार, दि. २७ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विजय याने रविवार, दि. २८ रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तक्रार दिल्यानंतर सहाजणांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास हवालदार राजू मुलाणी करत आहेत.