पालिकेच्या आवारात भरला ‘शेतकरी बझार’

By admin | Published: April 23, 2017 10:45 PM2017-04-23T22:45:28+5:302017-04-23T22:45:28+5:30

पालिकेच्या आवारात भरला ‘शेतकरी बझार’

Farmer Buzzar full of Municipal Corporation | पालिकेच्या आवारात भरला ‘शेतकरी बझार’

पालिकेच्या आवारात भरला ‘शेतकरी बझार’

Next


कऱ्हाडात राज्यातील पहिला प्रयोग : नगराध्यक्षांसह नगरसेवकांनीही खरेदी केली भाजी; आता आठवड्यातून दर रविवारी विक्री
कऱ्हाड : शहरातील रस्त्यावर उन्हामध्ये जीव व्याकूळ होईपर्यंत दिवसभर भाजीविक्री करणाऱ्या शेतकऱ्याने चक्क आपला भाजीपाला पालिकेच्या आवारात आणून विकला. अवघ्या काही तासांतच त्याचा भाजीपाला योग्य दराने विकला गेल्याने त्याने याचे समाधान व्यक्त केले. हा प्रकार कऱ्हाड पालिकेत रविवारी घडला. राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विधानभवनाच्या आवारात भरविलेल्या शेतकरी बझारनंतर राज्यातील पहिला शेतकरी बझार भरविण्याचा मान हा कऱ्हाड पालिकेने प्राप्त केला.
कऱ्हाड शहरातील मूळ शिवाजी भाजीमंडईच्या बाजूला असणारी जागा वापरात आणली जात नसल्यामुळे या ठिकाणी भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्याला रस्त्यावरच भाजी विकत बसावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला भाजीपाला सहज विकता यावा म्हणून पालिकेच्या आवारातच राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बझार’ भरविण्यात यावा, अशी घोषणा कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर रविवारी प्रत्यक्ष पालिकेच्या आवारात शेतकरी बझार भरविण्यात आला. यावेळी कृषी विभागाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना शासनाचे ओळखपत्र व भाजीपाला विक्री केल्याप्रकरणी प्रशस्ती प्रमाणपत्रही देण्यात आले.
विशेष म्हणजे रविवार हा प्रशासकीय सुटीचा वार असूनही केवळ शेतकऱ्यांच्या शेतकरी बझारसाठी स्वत: कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापासून कृषी विभागातील अधिकारी व पालिकेतील शिपायांपासून ते मुख्याधिकाऱ्यांपर्यंत आणि नगराध्यक्षांपासून ते नगरसेवकांपर्यंत सर्वांनी उपस्थिती लावून या शेतकरी बझारचे मोठ्या थाटात उद्घाटन केले. रविवारी दुपारी बारा वाजता हळूहळू शेतकरी पालिकेत आपला भाजीपाला घेऊन दाखल झाले. एक-एककरून शंभरभर शेतकऱ्यांनी पालिकेच्या आवारात भाजीविक्रीसाठी हजेरी लावली तर त्याच्या संख्येने नागरिकांनीही या ठिकाणी येऊन भाजी खरेदी केली. स्वत: कृषी व पणन राज्यमंत्र्यांनीही या ठिकाणी रविवारी येऊन कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्याची मेथी, दोडका, पेरू, काकडी खरेदी केली. ‘हार नको पण भाजी द्या,’ असे कृषी व पणन राज्यमंत्र्यांच्या तोंडून ऐकताच शेतकऱ्यांनीही पालिकेच्या आवारात दर रविवारी भरविण्यात येणाऱ्या शेतकरी बझारचे समाधान व्यक्त करीत स्वागत केले.
शहरात सध्या सुपर मार्केट परिसरातील संभाजी भाजी मंडई व दुसरी शहरातील पालिकेसमोरील शिवाजी भाजी मंडई या दोन ठिकाणी मंडई भरते. तसेच पोस्ट आॅफिस मार्गावर. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी येथील व्यापाऱ्यांकडून जागा दिली जात नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा तोटा होतो. यावर तोडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वेळोवेळी केली जात होती. अखेर आठवड्यातील प्रत्येक रविवारी पालिकेच्या आवारातच ‘संत शिरोमणी सावता माळी शेतकरी बझार’ भरविण्याचा निर्णय कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या आदेशाने घेण्यात आला आणि वर्षानुवर्षे रस्त्यावर बसून विकणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांची जागा मिळाली. (प्रतिनिधी)
छत्र्यांपासून ते पिण्याच्या पाण्याची सोय
कऱ्हाड पालिकेच्या आवारात रविवारी भरविलेल्या शेतकरी बझारसाठी राज्य शासनाच्या कृषी व पणन विभाग तसेच पालिकेच्या वतीने थंडगार पिण्याचे पाणी, विक्रेत्यांना सावलीसाठी छत्र्यांचीही सोय करण्यात आली होती. शिवाय पालिकेच्या आवारात भाजीविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची व खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही कर्मचाऱ्यांकडून काळजी घेतली जात होती.

Web Title: Farmer Buzzar full of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.