'महावितरण'चा गलथान कारभार, विजेची तार तुटुन शेतातील पाण्यात वीज प्रवाह, हेळगावातील शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 04:17 PM2022-03-05T16:17:52+5:302022-03-05T16:18:32+5:30
मसूर: हेळगाव (ता. कऱ्हाड) येथील सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनील शंकरराव पाटील (वय ५४) यांचा शेतात विजेचा धक्का लागून जागीच ...
मसूर: हेळगाव (ता. कऱ्हाड) येथील सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनील शंकरराव पाटील (वय ५४) यांचा शेतात विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. त्यांचे चुलते किसन पाटील हेही विजेचा धक्का लागून किरकोळ जखमी झाले. वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभाराने ही घटना गुरुवारी (दि.३) सकाळी घडली असून, यातून दोघे बचावले आहेत.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हेळगाव विकास सेवा सोसायटीचे चेअरमन हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात असणाऱ्या खांबावरील विजेची बंद तार विद्युत प्रवाह चालू असलेल्या तारेवर तुटून पडल्याने शेतातील पाण्यात वीज प्रवाह चालू झाला. त्यामुळे सुनील पाटील हे पाण्यात गेले असता, त्यांना विजेचा तीव्र धक्का लागून ते जागीच मृत्युमुखी पडले.
त्यांना शोधण्यासाठी गेलेले त्यांचे चुलते किसन गणपती पाटील यांनाही विजेचा धक्का लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर यांच्या पत्नी नंदा पाटील व चुलत बंधू अनिल पाटील यांनी वेळीच प्रसंगावधान राखल्याने दोघेजण या घटनेतून बचावले आहेत. या घटनेची फिर्याद मसूर पोलीस दूरक्षेत्रात देण्यात आली आहे.
सुनील पाटील हेळगावसह परिसरातील एक सांप्रदायिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व होते. ते भाऊ या नावाने परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.