बैलगाड्यांच्या शर्यतींसाठी शेतकरी थेट ध्वज स्तंभावर !
By admin | Published: March 22, 2017 10:49 PM2017-03-22T22:49:24+5:302017-03-22T22:49:24+5:30
रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दीड तास थरार; सर्वत्र एकच खळबळ
सातारा : राज्यातील बैलगाड्यांची शर्यत सुरू करावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, या मागणीसाठी सांगली येथील शेतकरी विजय जाधव यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तिरंग्याच्या ध्वज स्तंभावर चढून बुधवारी सकाळी अकरा वाजता आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली. ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे करून देतो,’ अशी पोलिसांनी समजूत घातली. त्यानंतर सुमारे दीड तासाच्या थरारानंतर जाधव खाली उतरले.
जाधव हे बुधवारी सकाळी सांगलीहून साताऱ्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथील ध्वज स्तंभावर चढून ते ‘इन्क्लाब जिंदाबाद,’ अशी घोषणा देत बैलगाड्यांची शर्यत सुरू करावी तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी करू लागले. हा प्रकार जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर सर्वजण बाहेर आले. तोपर्यंत पोलिसांना बोलविण्यात आले.
पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. ‘मी तिरंग्याच्या साक्षीने पेटवून आत्महत्या करेन,’ अशी ते धमकी देऊ लागले. दुसरीकडे पोलिसांनी जाधव यांना ध्वज स्तंभावरून खाली उतरविण्याच्या व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. अग्निशमक दल, सह्याद्री ट्रेकर्सचे जवान, क्रेन, नेट, जाळी अशाप्रकारचे सर्व साहित्य जमवाजमव करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. हे सर्व साहित्य ध्वज स्तंभाजवळ आणल्याचे दिसताच जाधव संतप्त झाले. शर्टच्या आतील खिशामध्ये दडवलेली रॉकेलची बाटली अन् लायटर बाहेर काढून पेटवून घेण्याची धमकी देऊ लागले. त्यामुळे नाईलाजास्तव पोलिसांना सर्व साहित्य त्यांच्यापासून दूर न्यावे लागले. (प्रतिनिधी)
पोलिसांशी झटापट!
ध्वज स्तंभावरून खाली उतरल्यानंतर माझ्याजवळ कोणी येऊ नका, असे विजय जाधव सांगू लागले. मात्र, बी. आर. पाटील हे बोलण्याचा बहाणा करत त्यांच्याजवळ पोहोचले. हे जाधव यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणात रॉकेलच्या बाटलीचे टोपण काढून अंगावर ओतून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी बी. आर. पाटील आणि हवालदार अनिल पवार, राहुल खाडे यांनी झडप घालून त्यांच्या हातातील रॉकेलची बाटली काढून घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीलगत त्यांना बसविण्यात आले. प्रसारमाध्यमांशी काहीवेळ त्यांनी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले.
माझे चार भाऊ पोलिस !
जाधव यांना ध्वज स्तंभावरून खाली उतरण्यासाठी पोलिस विनवणी करत होते. मात्र, जाधव त्यांच्या मागणीवर ठाम होते. पोलिसांकडून खूपच दबाव येऊ लागल्यानंतर जाधव खवळले. ‘माझे चार भाऊ पोलिस आहेत. तुमचा अन् माझा वाद नाही. त्यामुळे पोलिसांची भूमिका मी समजू शकतो,’ असे जाधव सांगू लागले. त्यावेळी पोलिस अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहत राहिले.
भावनाविवश होऊन त्यांनी
लावला घरातल्यांना फोन!
ध्वज स्तंभावरून जाधव यांना खाली उतरविण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झाल्यानंतर जाधव चवताळले. ‘मी आता पेटवून घेतो,’ अशी धमकी देत त्यांनी मोबाईलवरून घरातल्या लोकांना फोन लावला. ‘मी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी जीवन संपवत आहे. त्याला जबाबदार मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन असेल,’ असे त्यांनी सांगितले. हे ऐकून पोलिसांची पाचावर धारण बसली.
बाहेर आंदोलन अन्
कर्मचारी व्यस्त !
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असा एकही दिवस जात नाही की आंदोलन होत नाही. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी जाधव यांनी केलेल्या ध्वज स्तंभावरील आंदोलनाचे फारसे नवल वाटले नाही. काही मोजकेच अधिकारी आणि कर्मचारी जाधव यांचे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी बाहेर आले. मात्र, बाकीचे कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.