नोटाबंदीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By admin | Published: January 2, 2017 11:05 PM2017-01-02T23:05:31+5:302017-01-02T23:05:31+5:30
मृत शिंदी खुर्दचा : उधारी वाढल्याने होते तणावात; कर्ज मंजूर होऊनही हातात पैसे नाहीत
दहिवडी : पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम नोटाबंदीच्या निर्णयामुळे न मिळाल्याने हताश झालेल्या माण तालुक्यातील शिंदी खुर्द येथील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. संजय विनायक भोसले (वय २८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळेच भोसले यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
घटनास्थळ व ग्रामस्थांकडून मिळालेली माहिती अशी, येथील संजय भोसले हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी होते. त्यांनी पतसंस्थेकडे पन्नास हजार रुपयांचे कर्ज प्रकरण केले. ते मंजूरही झाले. त्यानंतर भोसले यांनी मोठ्या उत्साहाने आपल्या दोन ते तीन एकरांत कांद्याची लागणही केली. मात्र, याच सुमारास नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला. त्यावेळी कांद्याच्या रोपांची रक्कम, लावणी व भांगलणाची मजुरी देण्यासाठी त्यांच्याकडे रोख रक्कम उपलब्ध नव्हती. त्यामुळे हे सर्व व्यवहार उधारीवरच चालविले होते.
दरम्यान, भोसले यांचे कर्ज प्रकरण मंजूर झालेले असतानाही रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे संबंधित पतसंस्थेने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे भोसले हे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले. मलवडी बसस्थानकावर सायंकाळी मित्रांसमवेत याच बाबींची चर्चा ते करत होते. मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर ते शिंदी खुर्द येथील आपल्या घरी गेले. त्यानंतर कोणाला काही कळू न देता त्यांनी विषारी औषध प्राशन केले. काही वेळातच त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या.
ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांना तत्काळ दहिवडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात व नंतर वडूज येथील खासगीदवाखान्यात हलविले; मात्र उपचारांना प्रतिसाद देण्यापूर्वीच भोसले यांचा मृत्यू झाला. संजय भोसले यांच्या पश्चात अपंग वडील, आई, भाऊ-बहीण असा परिवार आहे. दहिवडी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी शिंदी खुर्द येथे त्यांच्या गावी भेट देऊन नातेवाइकांची विचारपूस करून मदतीचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)