शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रासाठी वेदनादायी
By admin | Published: December 27, 2015 11:52 PM2015-12-27T23:52:39+5:302015-12-28T00:33:27+5:30
आसाराम लोमटे : बलवडी (भा.) येथील २४ वे मराठी साहित्य संमेलन
आळसंद : पुरोगामित्वाचा डंका पिटणाऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रासाठी काळाकुट्ट अंधार असून, हा काळाकुट्ट अंधार नाहीसा करण्याचे काम साहित्यिकांनी करावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आत्महत्येची कारणे व उपाय शोधून साहित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांत जगण्याची उमेद निर्माण करण्याचे आवाहन संमेलनाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक व पत्रकार आसाराम लोमटे यांनी केले.
बलवडी (भा., ता. खानापूर) येथील ज्योतिर्लिंग साहित्य सेवा मंडळाच्या आयोजित २४ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, उद्योजक सतीश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सरपंच सौ. मनीषा दुपटे, उपसरपंच बापूसाहेब पवार उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्ज्वलन उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याहस्ते झाले.
आसाराम लोमटे म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र हा क्रांतिसिंह नाना पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. (बापू) लाड या क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या एकजुटीतून दुष्काळ निवारणासाठी ‘बळिराजा’ धरणाची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील साहित्य संमेलने ही मराठी भाषा जिवंत ठेवण्याचे काम करतात. माणसाचं जगणं आणि साहित्य यात अंतर नसावे.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, साहित्य हे समाजाची आई व आत्मा असून, त्याला जपले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या काळातही मोठा दुष्काळ होता. त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे ऐकिवात नाही. त्या काळात संतसाहित्याने शेतकऱ्यांना जगण्यास मोठे बळ दिले होते. दु:ख विसरण्याचा मार्ग संतांनी दिला होता. सद्यस्थितीत शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणाऱ्या साहित्याची गरज असून, त्याची साहित्यिकांवर मोठी जबाबदारी आहे. मात्र सध्याच्या साहित्यिकांकडे पाहिले, तर साहित्याचे बाजारीकरण झाल्याची खंत खोत यांनी व्यक्त केली.
खोत म्हणाले, असहिष्णुतेच्या मुद्द्यावर अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. याचे मला वाईट वाटतेच; पण ५ लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्यावेळी हेच सहिष्णूत साहित्यिक कुठे गेले होते? असा सवाल त्यांनी केला. साहित्यिकांची पांढऱ्या कागदावरची लेखणी थांबली तरी, काहीही फरक पडणार नाही. परंतु काळ्या भुईवरची शेतकऱ्यांची लेखणी थांबली, तर त्यावेळी सर्वकाही थांबेल, याचे भान ठेवून साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून बळिराजाच्या व्यथा व वेदना मांडल्या पाहिजेत.
उद्योजक सतीश चव्हाण म्हणाले, ग्रामीण भागातील महिला वर्ग अजून विज्ञान युगातही कर्मकांडात अडकला आहे. उपवास-तापास, पूजा-अर्चा यातच आपला बहुमूल्य वेळ वाया घालवत आहेत. महिलांना या कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी पुरुषांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले.
यावेळी ‘बलवडी भूषण’ पुरस्कार मनोहर पवार, ‘कृषिभूषण’ दशरथ पवार, तर ‘ज्योतिर्लिंग वाङ्मय’ पुरस्कार रघुराज मेटकरी यांना मान्यवरांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. तसेच ‘आदर्श शिक्षक’ सयाजी जाधव, अंध खेळाडू स्वाती चव्हाण यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी अंधकवी चंद्रकांत देशमुख, रघुनाथ पवार, पांडुरंग शितोळे, सतीश लोखंडे, सुरेश चव्हाण, सौ. अश्विनी चव्हाण, टी. के. पवार, रमेश सावंत, प्रताप जाधव, गणेश पवार, संजय निकम, देवकुमार दुपटे, शांतिनाथ मांगले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक दीपक पवार यांनी केले, आभार संतोष जाधव यांनी मानले. (वार्ताहर)