सावकारीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या !
By admin | Published: February 4, 2016 01:01 AM2016-02-04T01:01:51+5:302016-02-04T01:10:55+5:30
सूर्याचीवाडी : खिशातील चिठ्ठीबाबत पोलिसांकडून गोपनीयता
उंब्रज : पाटण तालुक्यातील सूर्याचीवाडी शिवारात झाडाला गळफास घेऊन एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. खासगी सावकाराच्या आर्थिक व्यवहाराला कंटाळून ही घटना घडल्याच्या चर्चेमुळे पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. मात्र त्यांच्या खिशातील चिठ्ठीबाबत अधिकाऱ्यांनी गोपनीयता बाळगली आहे.
गणपती श्रीपती घाडगे (वय ४५, रा. जाळगेवाडी, ता. पाटण) असे मृताचे नाव आहे. श्रीरंग बाबूराव कवठेकर (वय ४५, रा. सूर्याचीवाडी) यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगळवारी
(दि. २) सकाळी गणपती घाडगे सहा वाजता घरातून निघून गेले. त्यांच्या पत्नीने ही माहिती कवठेकर यांना दिली.
गावातील लोकांनी त्यांचा शोध घेतला असता, सूर्याचीवाडी गावच्या हद्दीत किसन रामचंद्र जगदाळे यांच्या ‘तळीचा फडा’ नावाच्या शिवारात त्यांचा मृतदेह आढळला. डोंगरालगत शेतातील झाडाला नायलॉनच्या दोरीने त्यांनी फास घेतल्याचे दिसून आले.
घाडगे यांच्या खिशात पोलिसांना एक चिठ्ठी मिळाली आहे. मात्र, त्यात काय लिहिले आहे, याबाबत पोलिसांनी गोपनीयता राखली आहे. या घटनेची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून, साहाय्यक फौजदार पी. एम. कोकाटे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)