Satara: नीरा कालव्याचे पाणी पेटले; फलटणला शेतकरी एकवटले!; आवर्तन सुरू करण्यासाठी काढला विराट मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 11:57 AM2024-05-14T11:57:36+5:302024-05-14T11:57:58+5:30
माळशिरस, सांगोला, फलटणमधील शेतकरी आक्रमक
फलटण (सातारा) : नीरा उजवा कालव्यातील पाण्यावरून माळशिरस, सांगोला आणि फलटण येथील शेतकरी आक्रमक झाले असून, तिन्ही तालुक्यांतील संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी दुपारी फलटण येथील उपअभियंता नीरा उजवा कालवा कार्यालयावर विराट मोर्चा काढला. शेतीसाठी आवर्तन पुन्हा सुरू केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार करीत आपल्या मागण्यांचे निवेदन कार्यकारी उपअभियंता यांना देण्यात आले.
नीरा कालव्याचे आवर्तन अचानक बंद करण्यात आल्याने तिन्ही तालुक्यांतील शेतकरी संतप्त झाले आहेत. आवर्तन पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळपासूनच शेतकरी नीरा कालवा कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर जमू लागले. हळूहळू ही गर्दी वाढत गेली. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन व राजकीय हस्तक्षेपामुळे आवर्तन बंद करण्यात आल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला.
कालवा सुरू करताना कालवा सल्लागार समितीतील सदस्यांना सांगता, मग बंद करताना कोणाला विचारून बंद केला, असा सवाल रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी उपस्थित केला. अधिकाऱ्यांना दि. १९ मेपर्यंतची मुदत देत आवर्तन पूर्ण करून मग उर्वरित कामे मार्गी लावावीत, अन्यथा याहीपेक्षा मोठा मोर्चा काढला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. आमदार दीपक चव्हाण यांनी चोवीस तासांत दुरुस्तीचे काम करून पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार दीपक चव्हाण, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, धैर्यशील मोहिते-पाटील, उत्तमराव जानकर यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
दुरुस्तीसाठी कालवा बंद
नीरा उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना कालव्याला मोठे भगदाड पडल्याने कालवा बंद करून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नीरा उजवा कालव्याचा विसर्ग पूर्ववत केल्यास गळती वाढण्याची शक्यता आहे. कालव्यालगत असलेल्या लोकवस्तीत पाणी शिरून वित्त व जीवितहानी होऊ शकते, अशी माहिती नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
हक्कभंग आणू
कालवा दुरुस्तीच्या कामी कोणती यंत्रणा सक्रिय आहे, असे रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी विचारले असता, दोन पोकलँड व दोन जेसीबीच्या माध्यमातून दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मात्र शेतकऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, तिथे केवळ दोन ट्रॅक्टर व एक जेसीबी आढळून आला. यावरून रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी अधिकारी जनतेसमोर खोटी माहिती देत असल्याने त्यांच्यावर हक्कभंग आणू, असा इशारा दिला.