ऊसवाहतुकीची डोकेदुखी, ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 02:04 PM2022-02-07T14:04:08+5:302022-02-07T14:04:28+5:30
ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ...
ओगलेवाडी : सध्या साखर कारखान्यांच्या ऊस हंगाम जोरात सुरू आहे. बऱ्याच ठिकाणचे ऊस तुटून गेले आहेत. तर काही शेतकऱ्यांचा ऊस अजूनही शेतात आहे. ऊस घेऊन जाताना अनेक ट्रॉल्या पलटी होत असल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहत आहे. नुकसानीबरोबरच ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने ‘चूक चालकाची, भीती मालकाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
साखर कारखान्यांचा ऊस हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक वाढली आहे. फडातून बाहेर निघालेला ऊस कारखान्यापर्यंत सुखरूप पोहोचणे महत्त्वाचे असते. बराचसा ऊस कारखान्यापर्यंत विना अडथळा पोहोचतोय. मात्र काही चालकांच्या चुकीमुळे ऊस ट्रॉली पलटी होत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कधी कधी आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. त्यामुळे फडातून बाहेर निघालेली ट्रॉली सुखरूप कारखान्यावर जाऊन पोहोचेल काय? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत आहे.
खराब रस्ते, क्षमतेपेक्षा जास्त भरलेली वजन, कमकुवत टायर, असमतोल रस्ता, तर कधी वाहनचालकांची चुकी यामुळे ट्रॉली पलटी होण्याचे प्रमाण वाढत आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर ऊस रस्त्यावर पडून राहतो. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने वजन कमी होण्याचा धोका कायम असतो. त्याचबरोबर ही ट्रॉली पुन्हा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही रकमेची मागणी केली जात आहे. त्यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.