वळवाच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:03 AM2021-05-05T05:03:01+5:302021-05-05T05:03:01+5:30
कऱ्हाड : गत आठवड्यापासून हजेरी लावणाऱ्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक गावांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेच्या ...
कऱ्हाड : गत आठवड्यापासून हजेरी लावणाऱ्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी तालुक्यातील अनेक गावांना अक्षरश: झोडपून काढले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे पावसाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याचा फटका बसला, तसेच गारपीटही झाली. एक तासाहून जास्त वेळ मोठ्या पावसाने परिसराला झोडपून काढले. या पावसात आंबा, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ऊस पिकाला हा पाऊस पोषक असला तरी आंबा, कलिंगड, टोमॅटो यासह अन्य फळवर्गीय पिकांना हा पाऊस मारक ठरला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर
कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही श्वानांचाही त्याने फडशा पाडला असून, परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गत काही महिन्यांपासून सुपने, काले, नारायणवाडी, आटके, चचेगाव, वहागाव, तळबीड परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन महिन्यांपूर्वी वनवासमाची परिसरात दोन बछड्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापूर्वी आगाशिव डोंगर परिसरातील धोंडेवाडी, जखीणवाडी, तसेच मलकापूर परिसरात बिबट्याने हल्ला करीत शेळ्या, तसेच मोकाट श्वान फस्त केले आहेत. सध्या चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शासकीय कार्यालयात कोरोनामुळे शुकशुकाट
कऱ्हाड : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने १५ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. शिवाय अत्यावश्यक सेवाही सकाळी अकरापर्यंत सुरू असल्याने शासकीय कार्यालये सध्या ओस पडली आहेत. पंचायत समिती, तहसील कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयांत कामानिमित्त नागरिकांची मोठी वर्दळ असते; पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने गर्दी करण्यावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे नेहमी गर्दीने भरून जाणारी शासकीय कार्यालये सध्या मात्र ओस पडली आहेत. शिवाय पन्नास टक्के उपस्थितीची अट असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही कार्यालयात कमी आहे.
ढेबेवाडीत झाडावर कोसळली वीज
सणबूर : ढेबेवाडी, ता. पाटण येथील वर्दळीच्या रस्त्यावर भर लोकवस्तीत असलेल्या नारळाच्या झाडावर रविवारी दुपारी वीज पडल्याने झाडाने पेट घेतला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. रविवारी दुपारपासून परिसरात वळवाच्या पावसाचे वातावरण होते. साडेतीन वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. वर्दळीच्या ढेबेवाडी-सणबूर रस्त्यानजीकच असलेल्या भाग्यश्री मंगल कार्यालयासमोरील बाळासाहेब रैनाक यांच्या घरासमोर नारळाच्या झाडावर दुपारी चारच्या सुमारास वीज कोसळली. त्यामुळे क्षणात झाडाने पेट घेतला. भरवस्तीत ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण होते.