शेतकऱ्यांनो सावधान... मापात होईल पाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:20+5:302021-09-25T04:42:20+5:30

कऱ्हाड : काटा वजन तोलतो; पण वजन तोलणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स काट्याला ‘रिमोट’वर ‘कंट्रोल’ करता येऊ शकते. कऱ्हाडात यापूर्वी अशा घटना ...

Farmers beware ... sin will be measured! | शेतकऱ्यांनो सावधान... मापात होईल पाप!

शेतकऱ्यांनो सावधान... मापात होईल पाप!

Next

कऱ्हाड : काटा वजन तोलतो; पण वजन तोलणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स काट्याला ‘रिमोट’वर ‘कंट्रोल’ करता येऊ शकते. कऱ्हाडात यापूर्वी अशा घटना घडल्या असून, मापात पाप करून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काही व्यापाऱ्यांनी हिरावलाही आहे. त्यामुळे सोयाबीनसह इतर शेतीमाल व्यापाऱ्याला घालताना शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

सोयाबीन हे हंगामी पीक. कऱ्हाड तालुक्यात बहुतांश शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेतात. सोयाबीनसोबतच घेवडा, हरभरा या पिकांचीही खरीप हंगामात लागवड होते. या पिकांचा कालावधी तीन ते चार महिन्यांचा. खर्चही अत्यल्प. पाण्याची आवश्यकताही जेमतेम. त्यामुळे हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनसह इतर नगदी पिकांकडे पाहिले जाते. यावर्षीही अनेक शेतकऱ्यांनी या पिकांची लागवड केली. मान्सूनच्या तडाख्यातून बऱ्यापैकी पिके तरली. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू झाला असून, वाळवण झाल्यानंतर शेतकरी त्याची विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांकडे जातात. व्यापारीही आर्द्रता तपासून चालू भावाप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देतात; मात्र दरापेक्षा वजनात काटा मारला जाण्याची शक्यता जास्त आहे.

सर्रास व्यापाऱ्यांकडे सध्या इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरला जातो. इतर काट्यांपेक्षा हा काटा शेतकऱ्यांच्या दृष्टीने विश्वासार्ह; मात्र याच काट्याद्वारे काही व्यापारी शेतकऱ्यांचा विश्वासघात करण्याची शक्यता असून, यापूर्वी इलेक्ट्रॉनिक काटा रिमोटवर कंट्रोल करून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या घटना कऱ्हाडात घडल्या आहेत.

...अशी होऊ शकते फसवणूक!

१) सोयाबीन, हरभरा यांसह इतर धान्याची पोती वजन न करता शेतकरी व्यापाऱ्याकडे आणतात.

२) व्यापारी इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर पोत्यांचे वजन करतो. डिजिटल मीटरवर वजन दाखविले जाते.

३) फसवणुकीच्या उद्देशानेच काही व्यापाऱ्यांनी वजनकाट्यात चीप बसविलेली असते.

४) वजनकाट्याचे डिजिटल आकडे नियंत्रित करणारा रिमोट व्यापाऱ्याच्या किचेन किंवा इतर वस्तूमध्ये असतो.

५) काट्यावर पोते ठेवताच व्यापारी रिमोटचे बटण दाबतो. ज्यामुळे वजन सहा ते सात किलोपर्यंत कमी दाखविले जाते.

- चौकट

दरातही निकष; शेतकरी हतबल

सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात सोयाबीन विक्रीची शेतकऱ्यांची धांदल असते. दिवाळी सणासाठी त्याद्वारे पैशाची तजवीज केली जाते; मात्र सोयाबीनला अपेक्षित दर कधीच मिळत नाही. आर्द्रता (फॅट) तपासूनच शेतकऱ्यांना दर दिला जातो. आर्द्रता १० असेल तरच संपूर्ण दर मिळतो; पण असे क्वचितच होते. त्याचबरोबर सोयाबीन पिवळे पडल्याचे डाग लागल्याचे कारण दाखवूनही शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्यास भाग पाडले जाते.

- चौकट

व्यापाऱ्यांकडील वजनकाट्यांचे प्रकार

१) दोलायमान काटा : या वजनकाट्याला दोन्ही बाजूस तराजू असतात. ज्यामध्ये एका बाजूला वजन तर दुसऱ्या बाजूला वस्तू, धान्य टाकून वजन मोजले जाते.

२) पट्टीकाटा : पट्टीकाटा हा त्या काट्याला असलेल्या पट्टीवरील मानकावर अवलंबून असतो. वजनाप्रमाणे काट्याची पट्टी सरकते. त्याद्वारे वजन तोलले जाते. ठरविले जाते.

३) इलेक्ट्रॉनिक वजनकाटा : दोलायमान आणि पट्टीकाटा कालबाह्य झाला. सध्या इलेक्ट्रॉनिक वजनकाटा वापरात आलाय. या काट्यावर डिजिटल पद्धतीने वजन दर्शविले जाते; मात्र त्यातही फसवाफसवी होते.

फोटो : २४केआरडी०४, ०५

कॅप्शन : प्रतिकात्मक

Web Title: Farmers beware ... sin will be measured!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.