शेंद्रे परिसरात शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:24 AM2021-07-05T04:24:24+5:302021-07-05T04:24:24+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे विभागात गेली दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेतकरी शेती शिवारात कोळपणी ...
शेंद्रे : सातारा तालुक्यातील शेंद्रे विभागात गेली दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने परिसरातील शेतकरी शेती शिवारात कोळपणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यात सुरुवातीच्या काळात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, भुईमूग, भात पिकाची पेरणी केली आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पेरणी केलेली पिके एक महिन्यात चांगली आली असून, पिकांची वाढही उत्तम झाली आहे.
ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात बैलांच्या साह्याने पिकांची पेरणी, कोळपणी करण्यात येत होती. परंतु कालांतराने बैलांची संख्या कमी झाल्याने आता सायकल हात कोळप्याने शेतकऱ्यांच्याकडून कोळपणी करण्यात येते. सायकल हात कोळप्याने एक व्यक्ती पिकामध्ये कोळपणी करू शकतो. त्यामुळे परिसरात सर्व ठिकाणी शेतकरी आपापल्या शेतात हात कोळप्याने कोळपणी करताना दिसून येत आहे. मागील महिन्यातच परिसरातील शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कोळपणी केल्याने पिकातील अतिरिक्त तण कमी होते तसेच पिकास बुडक्याला मातीचा भराव होत असल्याने तो पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे शेंद्रे परिसरातील शेंद्रे, सोनगाव, शेळकेवाडी,आष्टे परिसरातील शेतकरी कोळपणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
फोटो :
०४शेंदे
सातारा तालुक्यातील शेंद्रे परिसरातील शेती शिवारात सध्या कोळपणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.