कांद्याने केलाय शेतकऱ्यांचा वांदा!, 'स्वाभिमानी' टाकणार आमदार, खासदारांच्या दारात कांदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 04:18 PM2023-03-08T16:18:18+5:302023-03-08T16:19:06+5:30
'शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा'
रशीद शेख
औंध : दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात यंदा चांगला पाऊस झाला होता. मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळतील, या आशेने कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले. मध्यंतरीच्या काळात हवामानातील बदलामुळे कांदा पिकावर करप्यासह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी खर्च करून फवारण्या केल्या. मात्र दर नसल्याने कोण आवाज उठविणार याकडे लक्ष लागले आहे.
कांद्याला प्रतिकिलो ७ ते ८ रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणेही अवघड झाले आहे. कांद्याला मिळत असलेल्या अल्पदरामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी अल्पदराने होत असल्याने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. अल्पदरामुळे कांदा ऐरणीत भरून ठेवायचा, विक्री करायचा तर दर येईपर्यंत तो टिकेल का, या संभ्रमावस्थेत शेतकरी आहेत.
शेतकऱ्यांना कमी बाजारभावात सध्या नाइलाजास्तव कांदा द्यावा लागत आहे. कांदा लागण, भांगलन, फवारणी, उपटणे, काटणी या खर्चाचा हिशोब केला तर येथून पुढे कांदा करायचा की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यामुळे शासनाने किमान हमीभाव तरी द्यावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
आमदार, खासदारांच्या दारात कांदा टाकणार
कांदा दराबाबतीत सत्ताधारी आमदार, खासदारांनी जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे होते, तर विरोधी पक्षातील नेत्यांना आवाज उठविण्याची मोठी संधी होती; मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याची कोणाची तयारी दिसत नाही, त्यामुळे येत्या आठवड्यात जिल्ह्यातील आमदार, खासदारांच्या घरापुढे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी कांदा टाकून आंदोलन करणार आहोत, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला आहे.