पवनचक्की कंपन्यांपुढे शेतकरी हतबल!

By admin | Published: October 20, 2015 09:35 PM2015-10-20T21:35:46+5:302015-10-20T23:51:53+5:30

मोरणा परिसरातील चित्र : जमीनमालकावर खंडणी, मारहाणीचे गुन्हे : ’तारीख पे तारीख’ मुळे हैराण

Farmers fare hawks! | पवनचक्की कंपन्यांपुढे शेतकरी हतबल!

पवनचक्की कंपन्यांपुढे शेतकरी हतबल!

Next

पाटण : पोटच्या गोळ्याप्रमाणे जतन करून ठेवलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनी कवडीमोल किमतीला विकून पवनऊर्जा प्रकल्पासाठी ज्यांनी त्याग केला, त्याच मोरणा परिसरातील शेतकऱ्यांवर दाखल झालेल्या खंडणी, मारहाणीच्या गुन्ह्यामुळे संबंधित शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. हेलपाटे घालून बेजार झालेल्या शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले असून, पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींना आता शोधू कुठे, अशी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.गेल्या तीन वर्षांपूर्वी मोरणा परिसरातील पठारांवर पवनचक्क्यांचे जाळे उभे होण्यास सुरुवात झाली आहे. अजूनही पवनऊर्जा प्रकल्पाकामी घडामोडी सुरूच आहेत. जमिनींचे दलाल, गुंडांच्या टोळ्यांनी धुडगूस घातला आहे. यात खाकी वर्दीवाल्यांनी देखील ‘न भूतो न भविष्यती’अशा पद्धतीचा अतिरेक केला. यामुळे मोरणा भागातील बळीराजा चांगलाच भरडला गेला. नुसता भरडला नाही, तर खंडणीचे खोटे गुन्हे, मारहाण, नुकसान केले अशा गंभीर आरोपाखाली अनेक गावांतील शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाला असल्याचे आरोप होत आहेत. गोकुळतर्फ पाटण, आंबेघरतर्फ मरळी, काहीर, कळकेवाडी, वाहे, दिक्षी आटोली, पाचगणी, कोकिसरे, गवळीनगर, पळशी, पाणेरी अशा सुमारे २५ गावांतील शेतकरी व महिला दररोज पाटणला हेलपाटे घालताना दिसत आहेत. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत असलेले शेतकऱ्यांचे चेहरे पाहून त्या पवनचक्की कंपन्यांच्या अन्यायाची चीड नागरिकांना आल्याशिवाय राहत नाही. नेहमी सत्याचा विजय होतोच; पण ती वेळ येईपर्यंत हेलपाटे घालून बेजार होण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)


म्हणे पवनचक्कीची केस
मोरणा परिसरातील शेतकरी जर पाटणमध्ये दिसला आणि त्याला विचारले की, पाटणला काय काम आहे तर सर्रास सांगितले जाते की, पवनचक्कीची केस आहे. पवनचक्की संदर्भातील गुन्ह्यांची संख्या काढली तर ती जवळपास शेकडोच्या घरात जाईल.

कंपन्यांचे प्रतिनिधी संपर्कहीन
ज्या शेतकऱ्यांना बोगस चेक दिले, अशांच्या तक्रारी आहेत. तसेच जमिनींचे वाद आहेत. काहींना अजून जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठी पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींचा शोध घेताना शेतकरी बेजार झाला आहे. कुणी हैद्राबादला तर कुणी आंध्रप्रदेशात गेल्याचे सांगितले जाते. कंपन्यांनी पाटण, कऱ्हाड येथील कार्यालये बदलल्यामुळे प्रतिनिधींना कुठे शोधायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

आमदारांनी हस्तक्षेप करावा..

आमदार शंभूराज देसाई यांना शेतकऱ्यांवरील जुलूम व पवनचक्की प्रशासनाची अरेरावी चांगली ज्ञात आहे. त्याबाबत आमदारांना चीड आहे. मग आता पवनचक्की कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन आमदारांनीच शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmers fare hawks!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.