ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:04+5:302021-03-04T05:13:04+5:30

कुडाळ : कुडाळ आणि परिसरात अजून बऱ्याच क्षेत्रातील ऊस शेतातच उभा आहे. त्यातच उसाला तुरे फुटून मोडलेले आहेत. ऊसतोडणीसाठी ...

Farmers have to pay for cane harvesting | ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात पैसे

ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना मोजावे लागतात पैसे

Next

कुडाळ : कुडाळ आणि परिसरात अजून बऱ्याच क्षेत्रातील ऊस शेतातच उभा आहे. त्यातच उसाला तुरे फुटून मोडलेले आहेत. ऊसतोडणीसाठी शेतकरी अडचणीत असून टोळीवाल्यांकडून वाढेबांधणीच्या नावाखाली प्रतिटन ७० ते ८० रुपयांची मागणी होताना दिसत आहे. आधीच ऊसतोड होईना यामुळे त्रासलेल्या ऊस उत्पादकांना याचा आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे.

कोरोनाच्या स्थितीमुळे यावर्षी कारखान्यांचा गळीत हंगाम उशिराने सुरू झाला होता. तसेच तोडणी यंत्रणेच्या कमतरतेने परिसरातील ऊसतोडणीस विलंब झाला. यामुळे उसाला लवकर तोड मिळावी यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून, ऊसतोडणीसाठी मजुरांकडून अधिक मजुरीची मागणी केली जात असल्याने शेतकऱ्यांना या भुरदंड सोसावा लागत आहे. यामुळे शेतात ऊस उभा राहण्यापेक्षा मिळेल ते गोड समजून शेतकरी आर्थिक फटका सहन करीत आहे.

आजही कुडाळ आणि परिसरात किसनवीर, अजिंक्यतारा, शरयू, जरंडेश्वर या कारखान्यांच्या टोळ्या ऊसतोडणी करत आहेत. तरीही भागात अजून बऱ्याच ठिकाणी ऊस शिल्लक राहिलेला दिसत आहे.

आधीच ऊसतोडणीला उशीर होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आाहे. ऊसतोड मजुरांकडून तोडणीसाठी टनामागे ठरावीक रक्कम ठरवून दिल्याखेरीच तोडणीही होत नाही. यामुळे शेतकरी ऊसतोडणीसाठी स्लिप बॉय, टोळीच्या मुकादमाकडे हेलपाटे घेत आहेत. वेळेत उसाची तोड मिळत नसल्याने वजनात घट होऊन शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. अशातच कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने टोळीवाल्यांना स्वगृही परतण्याचे वेध लागले आहेत.

(कोट)

ऊसतोडणीसाठी मुळातच उशीर झाल्याने ऊसतोड कधी होणार, याची वाट पाहत बसावी लागत आहे. अशातच ऊसतोडणीकरिता मजुरांकडूनही काही ठरावीक रकमेची मागणी होत असून, वाहतुकीसाठीसुद्धा पैसे मोजावे लागत आहेत. याबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता शेतकऱ्यांकडून ऊसतोडणीसाठी अशी कोणतीही रक्कम घेऊ-येऊ नये असे स्पष्ट केले आहे. तरीही शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन लक्ष देण्याची गरज आहे.

- कृष्णा मोरे, शेतकरी

Web Title: Farmers have to pay for cane harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.