दूधदर घटल्याने शेतकरी अडचणीत

By Admin | Published: November 17, 2014 10:13 PM2014-11-17T22:13:51+5:302014-11-17T23:25:58+5:30

वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे

Farmers' inconvenience due to reduced milk prices | दूधदर घटल्याने शेतकरी अडचणीत

दूधदर घटल्याने शेतकरी अडचणीत

googlenewsNext

कोपर्डे हवेली : शेतीपूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दूध व्यवसाय करतात़ मात्र, सध्या हे शेतकरी चांगलेच अडचणीत आलेत. गत काही दिवसांपासून दूध दरात कपात झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. दूध दरात चार-पाच रुपयांचा फरक पडत असल्याने हा व्यवसाय करणारे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
वाढती महागाई, शेती उत्पादनातील अस्थिर भाव, वाढता उत्पादन खर्च, वाढती मजुरी, जनावरांचे वाढते भाव, खतांची दिवसेंदिवस होणारी भाववाढ आदी कारणामुळे शेतकरी अगोदरच चिंतेत आहेत़ अशातच दुधाचे दर कमी झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. शेतीला जोडधंदा म्हणून तालुक्यातील अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करीत आहेत़ काहीचा प्रपंच दुधावरच अवलंबून आहे़ पशुखाद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना ६ नोव्हेंबरपासून दूध संघ व शासनाने लिटरमागे तीन-चार रुपयांची कपात केल्याने शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे़ गत महिन्यापर्यंत म्हशीच्या दुधाचा लिटरचा दर दहा फॅटला ४९ रुपये होता़ हाच दर ६ नोव्हेंबर पासून ४५ रुपये ५० पैसे करण्यात आला आहे़ गाईच्या दुधाचा चार फॅटचा दर २३ रुपये ४० पैसे होता़ सध्या तोच दर २१ रुपये ४० पैसे करण्यात आला आहे़ तीन-चार रुपये दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला आहे़ त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी गोत्यात आल्याचे दिसत आहे़ ऊसदराचे घोंगडे भिजत पडले आहे़ अशातच दूध दर कमी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सध्या शेतकरी संघटनेत वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले आहेत. ऊसदराबाबतही अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे दूध दर वाढीसाठी कोण आवाज उठवणार? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पुढे उभा ठाकला आहे़ दूध दर वाढ झाली नाही तर शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय उद्ध्वस्त होऊ शकतो़ (वार्ताहर)

पशुखाद्याचे दरही अस्थिर
पशुखाद्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. दूध उत्पादकांना हा खर्च भागवितानाच नाकीनऊ येत आहेत. सरकी पेंड ५० किलोचा दर गत महिन्यात १ हजार १०० रुपये होता. त्यानंतर हा दर ५० रुपयांनी कमी होऊन सध्या तो १ हजार ५० रुपये झाला. सध्या या दरामध्ये २५ रुपये वाढ होऊन सरकी पेंड ५० किलोचा आजचा दर १ हजार ७५ रुपये झाला आहे.


दूध दरामध्ये कपात झाल्याने दूध व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे़ दुधाची दरवाढ होण्यासाठी दूध संघ आणि शासन यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- लक्ष्मण चव्हाण,
दूध डेअरी चालक, कोपर्डे हवेली

खाद्याचे दर, वैरण, खताचे दर आणि दूध दर या गोष्टींचा विचार केला असता, अगोदरच दूध व्यवसाय गोत्यात आहे़ त्यामध्येच दूध दरात कपात झाल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे़ दूध दर वाढीसाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे़
- जगन्नाथ चव्हाण, दूध उत्पादक

Web Title: Farmers' inconvenience due to reduced milk prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.