सात कामे करणारे कृषियंत्र ‘मेड इन उंब्रज’
By admin | Published: September 4, 2016 11:48 PM2016-09-04T23:48:10+5:302016-09-04T23:48:10+5:30
रोहित जाधवचे यश : जिल्हास्तरावरील यशानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपकरणाची निवड
अजय जाधव ल्ल उंब्रज
शालेय विद्यार्थ्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना असतात. अशा कल्पनेतूनच अनेक शोध, नवनवीन उपकरणे तयार होतात. अशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर सोन्याहून पिवळे. रोहित जाधव या विद्यार्थ्यांच्या कल्पनेतून बहुउद्देशीय कृषी अवजार या उपकरणाची निर्मिती झाली. या उपक्रमाची राज्य प्रदर्शनासाठी निवड झाल्याने सर्वत्र उंब्रजचा बोलबाला आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात रोहित अजित जाधव हा दहावीत शिकत आहे. रोहित लहानपणापासून चौकस बुद्धीचा. शेतीतील अनेक उपकरणे रोज बघत होता. यातून बहुउद्देशीय यंत्र तयार करण्याची भन्नाट कल्पना रोहितला सुचली.
रोहित जाधवने ही कल्पना शिक्षक रामचंद्र जाधव यांना सांगितली. मग काय गुरु-शिष्य ही कल्पना प्रत्येक्षात आणण्यासाठी कामाला लागले. त्यातूनच या यंत्राची निर्मिती झाली.
भारतदेश हा शेतीप्रधान देश आहे. येथे शेतात बळीराजा कष्ठ करतो, या कष्ठातून तो पिके घेतो. पीक चांगले यावे, यासाठी बळीराजा लाखोंच्या मशनरी, ट्रक्टर व इतर साहित्य विकत घेऊन शेतीची मशागत करतो; परंतु असे लाखो रुपये खर्चून शेती करणे अनेकांना शक्य होत नाही.
काही हजार रुपयांत बहुउद्देशीय यंत्र उपलब्ध झाले आणि हे यंत्र रोहितने शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेय. याच उपकरणाने जिल्हा पातळीवर पहिला नंबर मिळविला आहेच. राज्यातही निवड झाली आहे. जिल्हा पातळीवर या उपकरणास पहिला नंबर मिळाला. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव उत्तमराव आवारी, कमलाकर महामुनी, प्राचार्य एस. जे. जाधव, पर्यवेक्षक ए. एस. शेख, स्कूल कमिटी सदस्य यांनी रोहित जाधव, शिक्षक रामचंद्र जाधव यांचे कौतुक केले आहे.
यंत्र एक कामे सात
या बहुउद्देशीय यंत्रामुळे बियाणे पेरणे, खते एकाच वेळी टाकता येतात. पेरलेले पासाच्या साह्याने लगेचच पाठीमागे मुजवलेही जाते. औषधेही स्वयंचलित यंत्राने फवारली जातात. एकाच वेळी तीन कोळपी चालविली जाते. याद्वारेच सरी पाडता येतात. गादी वाफे तयार करता येतात, पिकाला भर घालता येते.
हे यंत्र आनंददायी आहे
जेथे लाखो रुपये खर्च होतो. तोच खर्च हजारात होत आहे. पेरताना दोन माणसे लागतात. इतर वेळी एकावर चालते.