शेतकऱ्याच्या आंदोलनाला बैलजोडी होणार साक्षी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 05:12 PM2017-10-14T17:12:08+5:302017-10-14T17:24:34+5:30
विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.
कऱ्हाड , दि. १४ : विदेशी पेटा प्राणीमित्र संघटनेने राज्य शासनाच्या कायद्याला आव्हान दिले आहे. तसेच राष्ट्रपतींच्या आदेशाचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ सोमवार, दि. १६ रोजी सातारा येथे होणाऱ्या आंदोलनास बैलांसह चालक-मालक, शेतकरीही सहभागी होणार आहेत. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवायचे, असा निर्धार बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी कऱ्हाड येथे केला.
सातारा येथे सोमवारी (दि. १६) रोजी बळीराजा प्राणी व बैलगाडी शर्यत बचाव समितीच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनाची कऱ्हाड येथे शनिवारी बैठक पार पडली. यावेळी अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनेचे सदस्य धनाजी शिंदे, पै. आनंदराव मोहिते, उदय पाटील, नाथाजी गरुड, पोपट गायकवाड, पै. रफिक इनामदार, विवेक पाटील आदींसह कऱ्हाड तालुक्यातील बैलगाडी चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी धनाजी शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात पहिल्यांदाच बैलगाडी शर्यतींसदर्भांत मोठे बेमुदत आंदोलन होणार आहे. यास हजारो बैलगाडी चालक-मालक आपल्या बैलांसह उपस्थित राहणार आहेत. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सातारा-सांगली जिल्ह्यांसह राज्यभरातून बैलगाडी चालक-मालक व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हे आंदोलन घरचे असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे सुरूच ठेवण्यात येणार आहे. अगदी दिवाळी आंदोलनस्थळी करावी लागली तरी चालेल. शासनाकडून मागण्या मान्य करण्यासंदर्भात पुढाकार घेतला जात आहे. मात्र, प्राणीमित्र याला विरोध करण्याचे काम करीत आहेत. तालुक्यातील दोनशेहून अधिक बैलगाड्या चालक-मालक हे आपल्या बैलांसह यामध्ये सहभागी होतील. चार वर्षे झाली शर्यतींसाठी लढत आहोत. आता कोणत्याही परिस्थिती मागे हटणार नाही. जोपर्यंत प्राणीमित्र संघटनेवर बंदी घातली जात नाही. आणि शर्यती सुरू केल्या जात नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे.
सातारा येथे होणाऱ्या बेमुदत आंदोलनात कऱ्हाड तालुक्यातील हजारो बैलगाडी चालक-मालक व शेतकऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे आवश्यक आहे. सर्वत्र जोरदार तयारी करून मतदान केल्यानंतर लगेच या आंदोलनासाठी सातारा येथे एकत्रित यावे, असे आवाहन पै. आनंदराव मोहिते यांनी केले.