Satara: लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 02:07 PM2024-01-24T14:07:39+5:302024-01-24T14:08:18+5:30

कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी

Farmers of Javali taluka of Satara district threw strawberries on the road due to rates | Satara: लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

Satara: लालचुटूक स्ट्रॉबेरीचे दर गडगडल्याने काळवंडली, जावळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांमध्ये स्ट्रॉबेरीचे पीक घेतले जाते. साधारणपणे २० ते २२ हेक्टर जमिनीवर सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरी पिकाची लागण होते. डिसेंबर महिन्यापासून हा हंगाम सुरू होत आहे. पुणे, मुंबई, तसेच जॅमचे चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीकडून याची मागणी होते. सद्य:स्थितीत स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी आहे; मात्र, कंपन्या केवळ वीस ते तीस रुपये दराने खरेदी करीत असल्याने स्ट्रॉबेरी रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.

स्ट्रॉबेरीचा दर कोसळला असल्याने स्ट्रॉबेरी उत्पादक संकटात सापडला आहे. याचा मोठा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे. सध्या स्ट्रॉबेरीला जॅमच्या कंपनीतून मागणी कमी झाली असल्याने स्ट्रॉबेरीचे दर २० ते ३० रुपयांवर आले आहेत. अचानकपणे स्ट्रॉबेरीचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांना तोडून ठेवलेला स्ट्रॉबेरी माल फेकून द्यावा लागला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्ट्रॉबेरी या पिकाला कोणत्याही प्रकारचे विमा कवच नसल्याने या नुकसानीची दाद कोणाकडे मागावी, असा सवाल शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना पाणी पुरेल का नाही, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली असतानाच स्ट्रॉबेरी पिकाचे दर पडल्याने शेतकऱ्याला अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागणार आहे.

स्ट्रॉबेरी पिकाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला लाखो रुपयांचे भांडवल उभे करावे लागते. सरकारकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच स्ट्रॉबेरी पिकाला दिले जात नसून कोणतेही अनुदान दिले जात नाही. अन्य पिकाला दिले जाणारे पीकविमा कवच हे स्ट्रॉबेरी पिकालाही लागू करण्यात यावे. या विमा कवचासाठी जे काही शुल्क भरावे लागेल, ते स्ट्रॉबेरी उत्पादक भरतील. त्यांना या विमा कवचाचा लाभ मिळावा. - रूपेश आंबुले, स्ट्रॉबेरी उत्पादक
 

स्ट्रॉबेरी उत्पादकांचे नुकसान करू नये

अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी पिकाला काहीअंशी फटका बसला. त्यामुळे कारखान्यांनी स्ट्रॉबेरी खरेदीचा दर २५ रुपये किलोवर आणला. गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीला ५५ ते ६० रुपये दर कारखाने देऊ शकतात, तर यंदा का नाही? कारखान्यांनी शेतकऱ्यांचा माल सन्मानानेच घ्यायला हवा. कष्टाने पिकवलेल्या मालाला कमी दर देऊन त्यांची थट्टा करू नये. जर कारखान्यांना स्ट्रॉबेरी नको असेल तर त्यांनी घेऊ नये; परंतु दर पाडून शेतकऱ्यांचे नुकसान करू नये. - किसनशेठ भिलारे, अध्यक्ष, फळे, फुले सहकारी संस्था, महाबळेश्वर

Web Title: Farmers of Javali taluka of Satara district threw strawberries on the road due to rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.