फलटणमधील शेतकरी पेरणीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:45+5:302021-06-25T04:27:45+5:30
फलटण : फलटण तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला ...
फलटण : फलटण तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी अजूनही पेरणीयोग्य झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाला असला तरी मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे, तर कालव्यावर अवलंबून असणाऱ्या काही शेतकऱ्यांनी मात्र पेरणी केली आहे.
फलटण तालुका रब्बीचा म्हणून ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पाऊस चांगला होत असल्याने शेतकरी खरीप हंगाम घेऊ लागले आहेत. पावसाचा अंदाज घेऊन मका, भुईमूग, तूर, हरभरा, भाजीपाला घेतला जातो. सध्या शेतकरी खरीप हंगामाची तयारी करीत आहेत. नांगरणी, शेणखत टाकणे, जमीन भुसभुशीत करणे या कामांना गती देऊ लागला आहे. या वर्षी आतापर्यंत तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीसाठी अजून तयार नाही, तर पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीची अडचण नाही.
खरीप हंगामात कमी व मध्यम कालावधीचे पीक घेण्याचा आग्रह कृषी विभागाकडून केला जात आहे. सध्या काही शेतकरी कांदा, आले पीक घेण्याच्या तयारीत आहेत. पाऊस थांबल्याने आता पावसाचे गणित लक्षात घेऊनच शेतकरी पेरणीच्या तयारीला लागणार आहेत.
फोटो दि.२४फलटण फार्म नावाने...
फोटो ओळ : फलटण तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे, पण पाऊस कमी असल्याने अजूनही पेरणीविना राने दिसून येत आहेत. (छाया : नसीर शिकलगार)
..............................................................................