शेतकऱ्यांची चाऱ्याला पर्याय म्हणून ऊसाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:25 AM2021-07-20T04:25:53+5:302021-07-20T04:25:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आदर्की : फलटण तालुक्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या मका पिकावर गेल्यावर्षीपासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव ...

Farmers prefer sugarcane as an alternative to fodder | शेतकऱ्यांची चाऱ्याला पर्याय म्हणून ऊसाला पसंती

शेतकऱ्यांची चाऱ्याला पर्याय म्हणून ऊसाला पसंती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आदर्की : फलटण तालुक्यात दूध उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या मका पिकावर गेल्यावर्षीपासून लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मका पिकाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चारा म्हणून ऊसाचा पर्याय निवडल्याचे दिसत आहे.

फलटण तालुक्यात शेतीला जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांनी दूध व्यवसाय निवडला. परंतु, फलटण तालुक्यात प्रत्येक चार-पाच वर्षांनी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने हिरव्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होत असे. भाकड जनावरांची संख्या वाढत होती. त्यामुळे दूध व्यवसाय तोट्यात होता. पण पंधरा दिवसाला हमखास पैसे देणारा व्यवसाय असल्याने टिकून होता. त्यावेळी शेतकरी ज्वारीची वैरणच चारा म्हणून जनावरांना घालत होते. वीस वर्षांपूर्वी सहकारी दूध संघाबरोबर खासगी डेअरी प्रकल्पाला मान्यता दिल्याने दुधाला चांगला दर मिळू लागला. यामुळे शेतकरी दुधाकडे व्यवसाय म्हणून पाहू लागला.

हिरवा चारा म्हणून गवत, घास, ऊस, कडवळ आदी संकरित गाईंना घातल्याने दूध उत्पादनात वाढ होऊ लागली. पण या चारा पिकासाठी चार ते पाच महिने लागत असल्याने दीड ते दोन महिन्यांत येणाऱ्या मका पिकाकडे शेतकरी वळला. त्यानंतर मका पिकामध्ये चारा मका, उत्पादनाचा मका, पॉपकॉर्न मका आदी प्रकारांमुळे उत्पादन व चारा असा दुहेरी फायदा मिळू लागला. त्यामुळे शेतकरी तिन्ही हंगामात मका पीक घेऊन त्यामध्ये धोम-बलकवडीच्या उजव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आल्याने दूध व्यवसायात बेरोजगार तरुण आले.

संकरित गाईंची संख्या वाढल्याने दूध उत्पादनात वाढ झाली. त्यामुळे मका हे मुख्य पीक झाले. परंतु, गत दोन वर्षांपासून मका पिकावर लष्करी अळी ही कीड पडू लागल्याने शेतकरी हैराण झाला आहे. प्रारंभी कृषी विभागाने मार्गदर्शन केले, परंतु मका पेरणी झाल्यानंतर दोन-तीनवेळा औषध फवारणी करणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी मका पिकाकडे पाठ फिरवून संकरित गाईंना ऊस तोडून घालण्यास सुरुवात केली. चारा म्हणून ऊसतोड जादा प्रमाणात होऊ लागल्याने एक पेंडास तीन ते चार रुपये दर शेतकरी सांगत असला तरी मका पिकाला पर्याय आता ऊसच उरल्याने ऊसाचे दर वाढत असल्याचे पाहायला मिळते.

चौकट

ग्रामीण भागात गोळी पेंड कारखाना ते डेअरी, गाडीवान, संकलन केंद्र, चालक असे दर वेगळे असल्याने कारखाना ते शेतकरी शंभर रूपयांचा फरक राहतो. तर पन्नास ते साठ किलो गोळी पेंड १,४०० ते १,५०० रुपयाला मिळते. त्यामुळे ऊस जनावरांना घालण्यास परडवत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस खरेदीकडे कल दिसत आहे.

प्रतिकिया

दूध उत्पादन वाढीसाठी मक्याचा चारा फायदेशीर ठरतो. मका पिकापासून बियाणे, भरडा, पॉपकॉर्न उत्पादन मका विक्रीतून पैसे मिळत असल्याने शेतकऱ्याला चार पैसे मिळत होते. आता लष्करी अळीमुळे मका पीक घेणे परवडत नाही. औषधाच्या फवारणीवर जादा खर्च होत असल्याने ऊस पीक फायदेशीर ठरत आहे.

- पांडुरंग अनपट

शेतकरी, सासवड, ता. फलटण

फोटो १९ आदर्की

फलटण तालुक्यात लष्करी अळीमुळे मका उत्पादन घटल्याने चाऱ्यासाठी ऊस तोडला जात आहे.

Web Title: Farmers prefer sugarcane as an alternative to fodder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.