शेतकऱ्यांनी मुख्य व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे बघावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:11+5:302021-03-07T04:35:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोरोनामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. या परिस्थितीमध्ये पशुपालन हा उत्तम रोजगार ठरू शकतो. त्यामुळेच शेतकऱ्यांनी मुख्य व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे बघावे, असे आवाहन सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत कामथी तर्फ सातारा येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - २ कामथी अंतर्गत पशु सर्वरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले. या शिबिराला उपस्थित राहात पंचायत समिती सभापती सरिता इंदलकर यांनी पशुपालकांना मार्गदर्शन केले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागामार्फत कामथी तर्फ सातारा येथे हे पशुरोग निदान व उपचार शिबिर घेण्यात आले.
यावेळी ११० जनावरांवर उपचार, शस्त्रक्रिया, खच्चीकरण, गर्भ तपासणी, कृत्रिम रेतन व वांझ तपासणी करण्यात आली व पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आले. पशुपालकांना वैरण विकास बियाणे कार्यक्रमांतर्गत बियाणे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे दूध वाढीसाठी लिक्विड कॅल्शिअमचे वाटप करण्यात आले.
पशुवैद्यकीय दवाखाना, कामथीच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध झाला असून, लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती पशुपालकांना देण्यात आली. या शिबिरासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुयोग वाघ, पशुधन विकास अधिकारी डॉ. आशाली लेंगरे, लिंबचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत विधाते उपस्थित होते.
या शिबिराचे नियोजन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम, विक्रम घाडगे यांनी केले. या शिबिराकरिता कामथी तर्फ साताराचे सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच साधना चव्हाण, नामदेव चव्हाण, अनिल पाटील, रुपेश चव्हाण व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
फोटो आहे :