Satara: धरणातील पाणी चोरी थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची पाटबंधारे विभागात धडक, जिहे-कटापूर योजनेबाबतही आक्रमक पवित्रा
By नितीन काळेल | Published: January 23, 2024 06:58 PM2024-01-23T18:58:01+5:302024-01-23T18:58:56+5:30
जिल्हाधिकारी आज निर्णय घेणार..
सातारा : जिहे-कठापूर योजना चारमाही असून पावसाळ्यात पाणी उचलण्याची परवानगी आहे. तरीही सध्या बेकायदेशीररित्या पाणी उपसा सुरू आहे. तर कण्हेर, धोम, उरमोडी धरण लाभक्षेत्रात दुष्काळ असतानाही पाणी चोरले जात आहे ते थांबवावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागात धडक मारुन आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठकीचे आश्वासन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सातारा, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्यासह अर्जूनभाऊ साळुंखे, मनोहर येवले, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, हणमंत शेडगे, तुकाराम शेडगे, राजेंद्र शेडगे, बजरंग कणसे, वसिम इनामदार, धोम संघर्ष समितीचे सदस्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
जिहे-कठापूर पाणी योजना ही पावसाळ्यात राबवायची आहे. पावसाळ्यात कृष्ण नदीपात्रातून वाहून जाणारे ३.१७ टीएमसी पाणी दुष्काळी भागासाठी आहे. खरीप हंगामापर्यंतच हे पाणी उचलण्याची परवानगी असताना पाटबंधारे विभागाने पूर्वीही बेकायदेशीररित्या पाणी योजनेसाठी सोडले होते. त्यावेळी आम्ही आंदोलन केले. राष्ट्रीय संपत्तीची चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. परंतु, आतापर्यंत कारवाईसाठी सोयस्कररित्या टाळाटाळ करण्यात करण्यात आली. असे असतानाच पुन्हा जिहे-कठापूर योजनेसाठी १९ जानेवारीपासून बेकायदा पाणी उपसा सुरू करण्यात येत आहे. बेकायदेशीररित्या जाणारे हे पाणी ताबडतोब बंद करावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी साताऱ्यातील कृष्णानगरच्या पाटबंधारे विभागात मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास आंदोलनास सुरूवात केली. तसेच कार्यालयाच्या समोरील जागेत ठिय्या मांडला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात सुरूवात केली.
शेतकऱ्यांच्या या पवित्र्यानंतर पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी बाहेर येऊन शेतकऱ्यांशी बोलणी सुरू केली. पण, शेतकरी पाणी थांबविल्याशिवाय माघार घेणार नाही या मागणीवर ठाम होते. तसेच टंचाई असताना कण्हेर, उरमोडी, धोम धरणातून आमच्या हक्काची पाण्याची चोरी होत आहे हेही थांबवा, असाही त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तर दुष्काळाने शेतकरी होरपळला असून आता हक्काचे पाणी चोरण्याने पिके वाया जाणार आहेत. यामुळे शेतकरी कर्जबाजारी होणार आहे, याला अधिकारी जबाबदार राहतील, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिला. तसेच मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले.
जिल्हाधिकारी आज निर्णय घेणार..
सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाने आंदोलनकर्ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लेखी आश्वासन दिले आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांबरोबर शेतकऱ्यांच्या मागण्या आणि जिहे-कटापूर पाणी योजनेविषयी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या कार्यालयात बुधवार, दि. २४ रोजी सकाळी सवा दहाला बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. आता बुधवारच्या या बैठकीत धरणांतील आणि जिहे-कठापूर पाणी योजनेबाबत काय निर्णय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.