पावसाच्या जोरदार सरींमुळे शेतकऱ्यांची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:05+5:302021-09-14T04:46:05+5:30
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाने सोयाबीन, घेवडा व कडधान्याची काढणी सुरू असलेल्या ...
रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसाने सोयाबीन, घेवडा व कडधान्याची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची दैना उडाली.
रहिमतपूर परिसरात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, हवेत गारठा आहे. रविवारी सायंकाळीही सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली होती. सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाचा जोर असल्यामुळे काही वेळातच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. सोयाबीन, घेवडा व कडधान्याची काढणी सुरू असलेल्या शेतकऱ्यांची पावसामुळे दैना उडाली.
दरम्यान, मध्यंतरी पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे शेती पिके वाया जाऊ नये म्हणून धोम पाटबंधारे विभागाच्यावतीने कॅनॉलला पाणी सोडण्यात आले आहे. रहिमतपूर परिसरातील कॅनॉलला पाणी पोहोचण्याच्या वेळेलाच पावसाने दमदार आगमन केल्याने पिकांसाठी पाण्याचा वापर होण्याची शक्यता कमी झाली आहे. पावसाने उघडीप दिली तरच कॅनॉलच्या पाण्याचा पुरेपूर वापर शेतकऱ्यांकडून पिकासाठी केला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत रहिमतपूर, साप परिसरातील कॅनॉलला पाणी पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रहिमतपूरसह परिसरातील साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, अंभेरी, वेलंग, कण्हेरखेड, पिंपरी, वाठार, किरोली, तारगाव आदी गावांत पावसाच्या सरी कोसळल्या.
१३रहिमतपूर
फोटो : रहिमतपूर (ता. कोरेगाव) येथे पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. (छाया : जयदीप जाधव)