कर्जामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: October 13, 2015 10:07 PM2015-10-13T22:07:03+5:302015-10-13T23:59:09+5:30
शशिकांत शिंदे : मंत्री केवळ मतदारसंघापुरतेच उरले असल्याची टीका
पुसेगाव : ‘शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. राज्याच्या विकासासाठी शासनाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही. राज्यातील मंत्री हे राज्याचे मंत्री राहिले नसून ते स्वत:च्या मतदारसंघापुरते राहिले आहेत. त्यांच्या मतभेदांचा परिणाम राज्याच्या विकासावर होणार आहे,’ अशी टीका माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.मोळ येथे नूतन ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, पंचायत समिती सभापती प्रभावती चव्हाण, वडूज मार्केट कमिटीचे सभापती सुनील घोरपडे, सतीश फडतरे, श्रीमंत झांजुर्णे, खरेदी-विक्री संघाचे संचालक डॉ. आनंदराव भोसले, मनोज गोडसे, पांडूरंग गोडसे, सरपंच सुप्रिया वाघ, उपसरपंच मोहन घाटगे, सोसायटीचे अध्यक्ष श्रीकांत घोरपडे, उपाध्यक्ष विजय भंडलकर, दिलीपराव काळंगे, किसनराव वाघ, जगन्नाथ घाटगे उपस्थित होते.
आमदार शिंंदे म्हणाले, ‘दुष्काळाच्या छायेत आपला शेतकरी कसे जीवन जगत असेल याविषयी तळमळ असल्यामुळे काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी खटाव-माणसह मराठवाड्याचा दुष्काळी भागाचा दौरा केला. दुष्काळी शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करावी, यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मराठवाड्यात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन आंदोलने ही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुष्काळी भागाचा दौरा करण्याचा दिखावा केला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ठोस मदत त्यांनी जाहीर केली नाही.’ (वार्ताहर)
सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला
‘आघाडी शासनाने यशस्वीपणे राबविलेल्या योजनांची केवळ नावे बदलून राज्यातील भाजप-शिवसेना सरकार नवीन योजना म्हणून राबवित आहे. राज्यातील या सरकारला एक वर्षे पूर्ण होत आली तरी अद्यापही ठोस विकासकामे दिसत नाहीत. राज्यातील जनतेला ‘अच्छे दिन’ आणण्याची स्वप्ने दाखून सत्तेवर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीकाही यावेळी आमदार शिंदे यांनी केली.