तरकारींना दर नसल्याने शेतकरी नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:55+5:302021-07-31T04:38:55+5:30
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या तरकारी पिकांना बाजारभावाची साथ ...
वरकुटे-मलवडी : माण तालुक्याच्या पूर्व भागातील वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, शेनवडी, कुरणेवाडी या भागातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या तरकारी पिकांना बाजारभावाची साथ मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. पिकांसाठी गुंतवलेले भांडवल सध्याच्या बाजारभावातून वसूल होत नसल्याने शेतकरीवर्गात नाराजीचे वातावरण दिसत आहे.
कोरोनाकाळात सतत लॉकडाउन असल्याने, गावोगावचे बाजार बंद झाले होते. त्यामुळे भाजीपाल्याच्या किमती घसरल्या होत्या. त्यानंतर सध्या लॉकडाऊन रद्द झाले आहे तरीही बाजारभाव जेमतेम मिळत आहे. येथील शेतकऱ्यांनी, ढोबळी मिरची, दोडका, गवार, मेथी आदी पालेभाज्यांंची पिके घेतली आहेत. या पिकांच्या बांधणीसाठी लाखो रुपयांचे भांडवलदेखील गुंतवले आहे. परंतु, सध्या या पिकांना कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. पिकांच्या विक्रीतून शेतकऱ्यांच्या हाती खर्च वजा जाता काहीच उरत नाही. काही ठिकाणी गुंतवलेले भांडवल अंगावर येत असल्याने शेतकरी नाराज झाला आहे.