वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:35 AM2021-03-07T04:35:50+5:302021-03-07T04:35:50+5:30

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने ...

Farmers in Wai taluka in trouble | वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

वाई तालुक्यात ऊसाला तुरे फुटल्याने शेतकरी अडचणीत

Next

वाई : सध्या वाई तालुक्यात ऊसाची तोड मोठ्या प्रमाणात चालू असली तरीही टोळ्यांचा तुटवडा असल्याने काही ठिकाणचा ऊस कारखान्याने नेला नसल्याने ऊसाला तुरे फुटलेले दिसत आहेत. ऊसाला तुरा फुटल्याने वजनात घट होऊन उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अहोरात्र कष्ट करूनही पदरी निराशा पडण्याची शक्यता आहे.

वाई तालुका ऊस, आले, हळद व भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर तालुक्यांच्या मानाने तालुका सधन मानला जातो. किसनवीर साखर कारखाना याच तालुक्यात असल्याने शेतकरी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात करीत असतात. या तालुक्यातील बागायती शेतकऱ्यांचे ऊस हेच पीक उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्याने या पिकाच्या बाबतीत कोणतीही तडजोड करताना शेतकरी दिसत नाहीत. अतिवृष्टीमुळे यावर्षी ऊसाच्या पिकाला कालावधीपूर्वीच तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार असून, बळीराजा पूर्णपणे अडचणीत येणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेऊन जावा, अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्षाच्या तयारीत आहे.

खरीप हंगामातील ऊस, हळद सोडून सर्व पिके वाया गेल्याने बळीराजाची सर्व भिस्त सध्या ऊसावर आहे. त्यालाच तुरे फुटल्याने ऊसाचे वजन कमी भरून पोकळ बांबू तयार झाला आहे. उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्वारी पिकाने ओढ दिल्यास शेतकरी जनावरांच्या चाऱ्यासाठी ऊसावरच अवलंबून राहतो. तुरे आल्याने जनावरांचा चाराही धोक्यात आल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात दिसत आहे. तरीही शेतकरी हा खोट्या आशेवर जगत असून, ऊसावर मोठी भिस्त ठेवून असतो. वाई तालुक्यात सध्या ऊसाच्या लागवडीला जोर आला असून, शेतात सध्या शेतकरी हा ऊसाची लागवड करताना दिसत आहे. याबाबत कारखान्याने वेळेत ऊसाची तोड करावी व तालुक्यातील बळीराजाला धीर देण्याचे काम करावे. ऊस हे श्रीमंताचे पीक असल्याचे मानले जाते; परंतु या पिकासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चौकट...

बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार

खते, बियाणे, शेताची मशागत, मजूर, लागणारे पाणी यासाठी शेतकरी विकास सेवा सोसायटीचे कर्ज काढतो. त्याचे व्याजही काहीवेळा निघत नाही. तरीही ऊसाच्या अंतर्गत होणाऱ्या इतर पिकांच्या उत्पन्नात समाधान मानून बळीराजा हे धाडस करताना दिसत आहे, अन्यथा साखर कारखाने व निसर्ग यांच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊन बळीराजा अडचणीत आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे, तरी ऊसाला तुरे आल्याने त्वरित ऊसाची तोड करून शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीपासून वाचवावे अशीही मागणी करण्यात येत आहे. तालुक्यातील बळीराजा वाचला तरच कारखाने वाचणार आहेत.

Web Title: Farmers in Wai taluka in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.