शेतकऱ्यांना स्वतः करता येणार पीक पाहणीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:31+5:302021-08-24T04:43:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मायणी : शेतकऱ्यांना हंगाममध्ये केलेल्या विविध पिकांची नोंद करण्यासाठी, तसेच पडीक जमीन व शेत बांधवांची झाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मायणी : शेतकऱ्यांना हंगाममध्ये केलेल्या विविध पिकांची नोंद करण्यासाठी, तसेच पडीक जमीन व शेत बांधवांची झाडे याची नोंद सात-बारावर भरण्यासाठी महसूल व कृषी विभागाने स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले असल्याने शेतकऱ्यांना आता स्वतःच्या पिकाची पीक पाहणी नोंद घरबसल्या, शेतामध्ये जाऊन करता येईल.
याबाबत अधिक माहिती अशी, प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये घेतलेल्या पिकांची पीक पाहणी नोंद करण्यासाठी कृषी व महसूल कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागत होते. शेतकऱ्यांचा वेळही वाया जात होता. कृषी विभाग व महसूल विभागाने शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी स्वतःच्या स्वतः भरण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले आहे. या शेतकऱ्याला स्वतःच्या शेतामध्ये जाऊन आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदवणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन किंवा घरामध्ये बसून विविध गोष्टी करणे गरजेचे आहे.
यामध्ये शेतकऱ्याने मोबाईलमध्ये https://play.google.com/store/apps/details?id=org.mahait.epeek या लिंक वर जाऊन ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करायचे आहे. हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून वापरता येते. मात्र, एकदा पीक पाहणी नोंद केल्यानंतर यामध्ये बदल करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक पाहणीची नोंद करताना काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
पीक पाहणी नोंद करताना गाव, तालुका, जिल्हा निवडल्यानंतर स्वतःच्या जमिनीचा किंवा जमीन मालकाचा खाते नंबर, सर्व्हे नंबर, नाव, आडनाव व मधले नाव टाकून स्वतःचे खाते शोधावे. खाते शोधल्यानंतर ते समाविष्ट केल्यानंतर चार अंकी ओटीपी मोबाईलवर उपलब्ध होतो. तो ओटीपी टाकून पुढील माहिती भरावी. यामध्ये एकूण पड जमीन, पेरणी केलेली जमीन क्षेत्र, तसेच कोणत्या हंगामात पीक घेतले आहे या हंगामाची नोंद, पिकांची वर्गवारी, पिकांचा प्रकार, जलसिंचन साधन, जलसिंचन प्रकार, लागवडीची दिनांक, तसेच मुख्य पिकाचा फोटो आदी माहिती शेतामध्ये जाऊन भरता येते.
शेतात बांधावर असलेल्या झाडांची नोंद या ॲपमध्ये करता येते, तसेच पड जमीन फोटो न काढता येईल फक्त क्षेत्र लावता येते. हे एक ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने हाताळता येते. मात्र, ऑफलाईन माहिती भरणाऱ्या शेतकऱ्यांनी भरलेली माहिती नंतर इंटरनेट सेवा देणाऱ्या दुकानांमध्ये जाऊन ऑनलाईन करावी. एकंदरीत हे ॲप शेतकऱ्यांच्या फायद्याचे असून यामुळे शेतकरीवर्गामध्ये नक्कीच समाधानाचे वातावरण निर्माण होईल. या ॲपबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी व महसूल कार्यालयात संपर्क करणे गरजेचे आहे.