औद्योगिक विकासासह शेतकऱ्यांनाही होणार फायदा
By admin | Published: February 27, 2015 09:49 PM2015-02-27T21:49:53+5:302015-02-27T23:16:52+5:30
पुणे-मिरज दुहेरी रेल्वेमार्ग : क्रॉसिंंगची समस्या संपुष्टात येणार
कोरेगाव : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे अर्थसंकल्पामध्ये पुणे-मिरज रेल्वेमार्ग दुहेरी करण्याचा निर्णय घेतल्याने सातारा जिल्ह्याचा मोठा विकास होणार आहे. औद्योगिक नगरी म्हणून विकसित होत असलेल्या लोणंदपासून शेणोलीपर्यंत शेतकऱ्यांना आपला शेती माल निर्यात करण्याबरोबरच देशाअंतर्गत मोठ्या शहरांमध्ये पाठविता येणार आहे. रेल्वेच्या सध्याच्या मार्गालगत अगोदरच भूसंपादन झाले असल्याने नव्या मार्गासाठी नव्याने भूमिसंपादन करावे लागणार नाही, त्यामुळे केवळ कामाचा श्रीफळ वाढविण्याच्या प्रतीक्षेत जनता आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईला कर्नाटक आणि गोवा या राज्यांना जोडणारा रेल्वेमार्ग सातारा जिल्ह्यातून जातो. हा मार्ग जवळचा असून, त्यावर अनेक छोट्या-मोठ्या गावांमध्ये स्थानके उभारण्यात आली आहेत. गेल्या दहा वर्षांत पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे; मात्र एकेरी मार्गामुळे त्यावर मर्यादा येत होत्या. पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या दुहेरी करणाला तत्वत: मान्यता दिल्याने याचा जनतेला मोठा फायदा होणार आहे. साधारणत: १२५ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग जिल्ह्यातून जातो. रेल्वेने सध्याच्या मार्गालगतच यापूर्वी भूमिसंपादन करून ठेवले आहे. १२५ किलोमीटर अंतरामध्ये साधारणत: ४० किलोमीटर दुहेरी वा तिहेरी मार्ग सध्या आहे. ते स्थानकांच्या परिसरात असून, त्याचा वापर सध्या रेल्वे क्रॉसिंगसाठी केला जात आहे. त्यामुळे इतर ठिकाणी नव्या मार्गासाठी खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
नवीन पुलाची उभारणी गरजेची
जिल्ह्यातून रेल्वे मार्गासाठी कृष्णा नदी मोठी अडसर ठरणार आहे. सातारा, कोरेगाव आणि कराड तालुक्यांतून वाहत असलेली ही नदी सातत्याने रेल्वेमार्गाला आडवी जात असल्याने त्यावर पुलाची उभारणी करणे गरजेचे ठरणार आहे. त्याचबरोबर वसना नदीसह तत्सम छोट्या नद्या आणि ओढ्यांवर पूल उभारणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
शेतीमालाची वाहतूक वाढण्याची शक्यता
रेल्वेमार्ग दुहेरी झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक साखर निर्यात होणार असून, कारखान्यांसह खासगी कंपन्या व वाहतूकदारांना रेल्वेचा पर्याय फायदेशीर ठरणार आहे. माल वाहतुकीबरोबरच प्रवाशांची वर्दळ वाढल्यानंतर स्थानकांवरील उलाढाल देखील वाढणार आहे.
क्रॉॅसिंगच्या समस्येला मिळणार पूर्णविराम
दुहेरी मार्गामुळे क्रॉसिंगच्या समस्येला पूर्णत: मूठमाती मिळणार असून, सध्याचा रटाळ प्रवास जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.
सध्या क्रॉसिंंगचे भूत पॅसेंजरवर बसत असल्याने कोल्हापूर-सातारा आणि सातारा-पुणे या अंतरासाठी तब्बल पाच तास प्रवास करावा लागत आहे.
लांब पल्ल्यांच्या गाड्या वेळापत्रकाप्रमाणे धावत नसल्याने सायंकाळी व रात्री पॅसेंजरमधून प्रवास करणे जिल्हावासीयांना धोक्याचे वाटत आहे.