सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत
By admin | Published: February 24, 2015 10:47 PM2015-02-24T22:47:43+5:302015-02-25T00:08:22+5:30
अपेक्षेवर पाणी : चांगले पैसे मिळतील म्हणून घरात रचून ठेवली होती पोती
कोपर्डे हवेली : सोयाबीन काढणीच्या हंगामात दर नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता दर वाढेल यासाठी सोयाबीनची पोती घरामध्येच रचून ठेवली. मात्र, सध्या दर वाढण्याऐवजी घसरत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी पडले आहे. यावर्षीचा सोयाबीन हंगाम अनेक गोष्टींमुळे अडचणीत आला होता. प्रतिकुल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले होते. परीणामी, सोयाबीनला चांगला दर मिळेल, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. सोयाबीन काढणीपूर्वी सुमारे ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रूपये क्विंटलचा दर होता. हंगामाच्या काढणीवेळी तो दर २ हजार ८०० रूपये ते ३ हजार रूपयेवर आला होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत सोयाबीन पिकाच्या उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोयाबीन बियाणे दुप्पटीने महागले आहे. तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सरासरी एकरी ७ ते ८ क्विंटल सोयाबीन शेतकरी काढतात. ते उत्पादन यावर्षी ३ ते ४ क्विंटलवर आले असल्याने आणि दरात वाढ होत नसल्याने सोयाबीनची शेती तोट्यात आली आहे.
गत महिन्यामध्ये सोयाबीनचा दर क्विंटलला ३ हजार ३०० रूपये होता. दर वाढेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, वाढण्याऐवजी गेल्या आठवड्यापासून दर उतरले आहेत. ३ हजार रूपये क्विंटलचा सोयाबीनचा दर झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये विक्रीसाठी शिल्लक ठेवले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शेतकरी दर वाढीकडे डोळे लावून बसला आहे. दर वाढण्याऐवजी दर कमी होत असल्याने शिल्लक सोयाबीनचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (वार्ताहर)
सोयाबीनला ५ हजार रूपये क्विंटलप्रमाणे दर मिळाला पाहिजे. तरच सोयाबीन पिकाचे उत्पादन परवडेल. दरात वाढ होण्याऐवजी दर घसरत असल्याने शिल्लक ठेवलेल्या सोयाबीनचे काय करायचे असा आमच्यापुढे प्रश्न आहे.
- जगन्नाथ चव्हाण, कोपर्डे हवेली