पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:43 AM2021-08-24T04:43:07+5:302021-08-24T04:43:07+5:30

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने ...

Farmers worried over heavy rains | पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त

googlenewsNext

मसूर : मसूर व परिसरात खरीप पिकांच्या आंतरमशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत; मात्र दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आडसाली लागण केलेल्या उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. पावसाच्या हुलकावणीने भातासह ऐन बहरात असलेल्या पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे.

जून महिन्यात झालेल्या दमदार पावसानंतर काही शेतकऱ्यांनी पावसापूर्वी खरीप हंगामातील पेरणी टोकणीसह आडसाली ऊस लागणीची कामे उरकून घेतली होती. काही अपवाद वगळता सर्व पिकांची उगवण व वाढही झपाट्याने झाली. त्यामुळे शेतकरी आनंदात होता; मात्र गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने काही प्रमाणात वाचलेली पिके पावसाअभावी वाया जाणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे. अगोदरच अतिवृष्टीने काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले होते आणि वादळी वाऱ्याने उसासह सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी पेरणीनंतर चांगल्या उगवण झालेल्या पिकांच्या भांगलण, कोळपण आदी आंतरमशागतीची कामे उरकून घेतली होती. आडसाली उसाची उगवण चांगली झालेली असून खते देण्याची कामे शेतकऱ्यांनी उरकून घेतली होती.

सध्या ऊस, भात, आले, हळद आधी पिकांना रोगापासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारचे खते व औषधे देण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आरफळ कालव्यावर बहुतांशी बागायती शेती अवलंबून आहे. सध्या आडसाली उसासह भात आले, हळद आदी पिकासाठी पाण्याची आवश्यकता असल्याने शेतकरी वर्गातून आरफळ कालव्याला पाणी सोडण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामात आगाप पेरणी केलेल्या नगदी सोयाबीनच्या पिकासह घेवडा, मूग, चवळी आदी पिके ऐन बहरात आहेत; मात्र पावसाने दडी मारल्याने या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

२३मसूर

मसूर परिसरात किडीपासून बचावासाठी आले पिकावर औषध फवारणी करण्यात येत आहे. (छाया : जगन्नाथ कुंभार)

Web Title: Farmers worried over heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.